पुणे: हिंजवडी, खराडी, हडपसर आणि मगरपट्टा या IT हबमध्ये वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक वाहतुकीच्या कमतरतेमुळे निर्माण झालेली गैरसोय लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) ने डबलडेकर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा काही निवडक मार्गांवर लवकरच सुरु होणार आहे.
PMPL प्रशासनाने एका खासगी कंपनीच्या पथकाला येत्या आठवड्यात पुण्यात पाहणीसाठी बोलावले आहे. पाहणी पूर्ण झाल्यानंतर निवडक मार्गांवर डबलडेकर बस चालवण्याचा प्रयोग केला जाणार आहे. ही बस सेवा मुख्यतः IT कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन प्रवासात सुधारणा करण्यासाठी असेल.
पाच वर्षांपासून डबलडेकर बस प्रकल्पाचे प्रस्ताव तयार करूनही त्यावर अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. मात्र आता नव्याने नियुक्त करण्यात आलेले PMPL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी या प्रकल्पाला गती दिली आहे. याबाबत त्यांनी संबंधित खासगी कंपनीच्या प्रतिनिधींशी बैठक घेऊन प्रत्यक्ष पाहणीसाठी निमंत्रण दिले आहे.
डबलडेकर बसची वैशिष्ट्ये:
- उंची: १४ फूट ४ इंच
- प्रकार: इलेक्ट्रिक, वातानुकूलित
- बसण्याची क्षमता: ७० प्रवासी
- उभं राहण्याची क्षमता: ४० प्रवासी
- आरामदायक व आधुनिक तंत्रज्ञानयुक्त डिझाईन
- देखभाल खर्च कमी
या सेवेमुळे IT कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार असून खासगी वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. PMPML प्रशासनाचा हा उपक्रम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणारा ठरणार आहे.