द्विदशकपूर्तीनिमित्त कनेक्टिंग ट्रस्टतर्फे स्वयंसेवकांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन

पुणे: गेल्या २० वर्षांपासून लोकांच्या मानसिक, भावनिक आरोग्यासाठी आणि समाजात होत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी कनेक्टिंग ट्रस्ट ही पुण्यातील स्वयंसेवी संस्था अविरत कार्य करत आहे. आत्महत्या प्रतिबंधाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कनेक्टिंग ट्रस्ट संस्थेला यंदा २० वर्ष पूर्ण होत आहेत. संस्थेच्या द्विदशकपूर्तीनिमित्त येत्या २३ ऑगस्ट २०२५ रोजी हितचिंतक व स्वयंसेवकांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. यासह इतरही उपक्रम आयोजिले जाणार आहेत, अशी माहिती कनेक्टिंग ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता मडकईकर यांनी दिली.

प्रणिता मडकईकर म्हणाल्या, “कनेक्टिंग ट्रस्टचे सर्व प्रकल्प स्वयंसेवकांमार्फत राबविण्यात येतात. अनेक दानशूर मंडळींच्या, संस्थांच्या आणि कंपन्यांच्या अर्थसहाय्यावर हे काम सुरु आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ४ ऑक्टोबर २०२५ रोजी बोमन इराणी यांच्या ‘क्लास ऍक्ट’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भावनिक आरोग्य आणि आत्महत्या याविषयी जनजागृती व्हावी आणि आत्महत्येमुळे दगावलेल्याना श्रद्धांजली वाहण्यासाठी ११ ऑक्टोबर २०२५ रोजी कँडल मार्च आयोजिला आहे. २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान आत्महत्या प्रतिबंधातल्या विविध घटकांचा आढावा घेणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद पुण्यात भरवली जाणार असून, आत्महत्या रोखण्याकरीता कार्यरत असलेल्या सामाजिक संस्था, मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक संशोधक आणि विद्यार्थी ह्यामध्ये सहभागी होतील. समाजात घडत असलेल्या आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी कोणकोणते विधायक पावले उचलता येतील, यावर विचारविनिमय केला जाणार आहे.”

श्रीमती अर्नवाज दमानिया यांनी सन २००५ साली कनेक्टिंग ट्रस्टची स्थापना केली. समाजात वाढत चाललेल्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि एक भावनिकरित्या संवेदनशील समुदायाच्या निर्मितीसाठी संस्था चालू केली. गेली २० वर्षे हे काम स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर अव्याहात चालू असून ह्यापुढेही अविरत चालू राहील. मनात आत्महत्येचे विचार येतात आणि जे आत्महत्येमुळे बाधित आहेत, अशाना भावनिक आधार देत जनजागृती करून आणि विद्यार्थ्यांसोबत सातत्याने काम करून आत्महत्या रोखण्याचे काम कनेक्टिंगतर्फे केले जाते. संवेदनशील समाजनिर्मिती आणि आत्महत्यांचे प्रमाण आटोक्यात आणणे हे ट्रस्टचे ध्येय आहे, असे मडकईकर यांनी नमूद केले.