कल्याण : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना काही महिनेच उरले असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच कल्याणमधून काँग्रेससाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
हा पक्षप्रवेश सोहळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना चव्हाण यांनी महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यांच्या या विधानामुळे महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रविंद्र चव्हाण म्हणाले, “कल्याण-डोंबिवलीमध्ये विकासाचे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण दूर करायचे असेल तर भाजपचा महापौर होणे अत्यंत गरजेचे आहे. कल्याण-डोंबिवली भाजपमय करायचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कामाला लागा.”
या पक्षप्रवेशामुळे भाजपची कल्याणमधील ताकद आणखी मजबूत झाली असून काँग्रेसला यामुळे मोठा धक्का बसला आहे. स्थानिक निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला लागलेली ही ठिणगी पक्षासाठी चिंतेची बाब ठरू शकते.