पुणे – मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पुण्यात उंड्री-हांडेवाडी रस्त्यावर घडली आहे. एका तरुणाचा खून झाल्यानंतर त्याच्याच जवळच्या मित्राने पोलिसांना खोटी माहिती देत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या दोन तासांत खुनाचा तपास उघडकीस आला आणि खरा आरोपी गजाआड गेला.
खून झालेल्या तरुणाचे नाव रविकुमार शिवशंकर यादव (वय ३०) असे असून, त्याच्या मित्रानेच – किसन राजमंगल शहा – त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. खून केल्यानंतर किसन शहा याने तात्काळ पोलिसांच्या ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून, “चार अनोळखी इसमांनी रविकुमारला मारहाण केली” असे सांगितले. यामागे कारणही खोटे सांगत, “रविकुमारने दुकानातून बेडशीट आणि गादी दिली नाही, म्हणून वाद झाला,” असेही पोलिसांना सांगितले.
मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच काही तासांतच खऱ्या घटनेचे धागेदोरे मिळू लागले. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक रहिवाशांच्या जबाबांमधून पोलिसांना मोठे विसंगती आढळून आल्या. त्या परिसरात कुठल्याही अनोळखी व्यक्तींची हालचाल आढळून आली नाही. याच वेळी स्थानिकांनी दिलेल्या माहितीतून समजले की, रविकुमार आणि किसनमध्ये पूर्वीही अनेक वेळा किरकोळ कारणांवरून वाद होत असत.
या आधारावर पोलिसांनी किसन शहा याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी करताच, पोलिसांचा खाकीचा धाक पाहून त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला आणि रविकुमारने शिवीगाळ करत हात उगारल्यामुळे रागाच्या भरात त्याने खून केला.
सध्या पोलिसांनी आरोपी किसन शहा याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मित्रानेच खून करून पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची ही घटना सर्वांच्याच अंगावर शहारे आणणारी ठरली आहे.