नांदेड-पुणे वंदे भारत : डिसेंबरपर्यंत सेवा सुरु होण्याची शक्यता!

नांदेड | (प्रतिनिधी मानस मते) : मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी पुणे हे शैक्षणिक व व्यावसायिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. दररोज नांदेडहून पुण्याकडे आणि पुन्हा नांदेडकडे विद्यार्थ्यांचा व व्यावसायिकांचा प्रवास सुरू असतो.

मात्र, सध्याच्या घडीला नांदेड ते पुणे दरम्यान दिवसभरात एकही रेल्वे उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ही गरज लक्षात घेता खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी नांदेड-लातूर-उस्मानाबाद मार्गे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती.

या मागणीवर रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, डिसेंबर २०२५ पर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. लातूर रोड व परळी वैजनाथ या स्थानकांवर इंजिन बदलण्याची प्रक्रिया जलद करण्यासाठी चौपदरी लाईनचे काम करणे आवश्यक आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

या सुधारणा पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून धावणाऱ्या १० ते १२ रेल्वे गाड्यांच्या प्रवासाच्या वेळेत घट होणार असून, यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. शिवाय, रेल्वेला आर्थिकदृष्ट्या बचत होईल आणि सेवा अधिक कार्यक्षम होईल, असेही त्यांनी नमूद केले.