पुण्यात १ ऑगस्टला वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; अनेक मुख्य रस्ते बंद, पर्यायी मार्ग जाहीर

पुणे | (प्रतिनिधी मानस मते): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी पुणे शहरात विविध संस्था, मंडळे आणि राजकीय पक्षांच्या वतीने सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी मिरवणुका आयोजित करण्यात येणार आहेत. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असून, काही महत्त्वाचे मार्ग तात्पुरते बंद राहणार आहेत.

वाहतूक पोलीस उप-आयुक्त हिंमत जाधव यांच्या आदेशानुसार, १ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजल्यापासून आवश्यकतेनुसार वाहतूक वळवण्यात येणार आहे. मात्र अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलीस यांसारख्या अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

🚫 बंद राहणारे रस्ते:

  • जेधे चौक ते सारसबाग दरम्यानचा बालाजी विश्वनाथ पथ पूर्णतः बंद
  • वेगा सेंटर ते सारसबाग ग्रेडसेपरेटर मार्ग बंद
  • सावरकर चौक ते पुरम चौक दरम्यानची वाहतूक पूर्णतः बंद
  • दांडेकर पुल ते सावरकर चौक दरम्यानची वाहतूक बंद
  • जेधे चौकातील वाय-जंक्शन (फ्लायओव्हर) वरून सारसबागकडे जाणे बंद

✅ पर्यायी मार्ग:

  • जेधे चौक ते सिंहगड रोड: सातारा रोड – व्होल्गा चौक – मित्रमंडळ चौक – सावरकर चौक
  • सिंहगड रोड ते स्वारगेट: दांडेकर पुल – नाथ पै चौक – ना.सी. फडके चौक – पुरम चौक – टिळक रोड – जेधे चौक
  • कात्रजहून येणारी वाहने: लक्ष्मीनारायण (व्होल्गा चौक) येथून डावीकडे वळावे
  • राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक हा मार्ग वापरण्याचा सल्ला
  • नाथ पै चौक – सावरकर चौक – दांडेकर पुल – ना.सी. फडके चौक – कल्पना हॉटेल – टिळक रोड – पुरम चौक मार्गे पर्यायी वाहतूक
  • निलायम ब्रिजने सावरकर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना पर्वती गाव मार्गे वळवले जाईल

🕒 वाहतूक व्यवस्था विशेष सूचना:

  • दांडेकर पुल आणि सावरकर चौक येथील वाहतूक दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत दुहेरी मार्गाने सुरू ठेवण्यात येईल.

नागरिकांनी वाहतूक पोलिसांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.