Amravati Ghost Viral Video : अमरावतीत ‘भूताने मारहाण’ प्रकरणाचा सोशल मीडियावर गोंधळ; पोलिसांनी दिलं सत्य स्पष्ट

Amravati Ghost Viral Video : डिजिटल युगात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा खोट्या किंवा अतिरंजित बातम्या व्हायरल होत असतात. सध्या अमरावती शहरातील असाच एक कथित “भूतप्रेत” प्रकरणाचा व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावर जोरात फिरत आहेत. या व्हिडीओमध्ये एका युवकाला “स्त्री भूताने” मारहाण केल्याचा दावा केला जात आहे, ज्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीमधील छत्री तलाव परिसरात एक युवक भूताच्या हल्ल्याचा बळी ठरल्याचा दावा करणारा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही व्हिडीओंमध्ये अंधारात घाबरलेली महिलांची ओरड ऐकू येते, तर काही फोटोमध्ये जखमी युवक आणि एक कथित स्त्री भूत दाखवलं गेलं आहे. हे सगळं पाहून अनेक नागरिक भयभीत झाले असून शहरात वेगवेगळ्या अफवा आणि चर्चांना उधाण आलं आहे.

अमरावती पोलीस प्रशासनाने या सर्व दाव्यांना पूर्णपणे खोटं ठरवत स्पष्ट केले की, “स्त्री भूत” किंवा कुठल्याही अतींद्रिय शक्तीचा सहभाग या प्रकरणात नाही. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले की, हेच व्हिडीओ क्लिप्स दीड वर्षांपूर्वीही व्हायरल झाले होते आणि त्यावेळीदेखील अशाच प्रकारे भीती पसरवण्याचा प्रयत्न झाला होता. या व्हिडीओमधील व्यक्ती किंवा मारहाणीचा दावा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून अधिकृत तक्रार अद्याप प्राप्त झालेली नाही.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, व्हायरल व्हिडीओ आणि फोटो हे कोणत्याही ठोस पुराव्यावर आधारित नाहीत. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचीच खात्री घ्यावी. सोशल मीडियावर अशा बनावट व्हिडीओ आणि फोटोंच्या आधारे भीती निर्माण करणाऱ्या गोष्टी पसरवणे ही कायदेशीरदृष्ट्या गंभीर बाब आहे, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.