श्रावण शुद्धसप्तमी ३१ जुलै गोस्वामी संत तुलसीदास तिथीनुसार जयंती निमित्त लेख

By: Editor _2

On: Monday, July 28, 2025 3:00 PM

Google News
Follow Us

महान संत तुलसीदास

श्रावण शुद्ध सप्तमीला म्हणजे या वर्षी ३१ जुलैला  गोस्वामी संत तुलसीदास यांची जयंती आहे, त्या निमित्ताने त्यांचे चरित्र थोडक्यात जाणून घेऊया.

महान संत तुलसीदास : जन्म इ. सन १६ ऑगस्ट १५११ (विक्रम संवत १५६८) आणि देहत्याग इ. सन ३० जुलै १६२३ ( विक्रम संवत १६८०)

जन्म आणि बालपण : उत्तर प्रदेशात हस्तिनापुर येथे आत्माराम आणि हुलसी यांच्या पोटी श्रावण शुद्ध सप्तमीला तुलसीदासांचा जन्म झाला. ते मातेच्या उदरात बारा महिने होते. जन्माच्यावेळी मूळ नक्षत्र होते, मुखात बत्तीस दात होते, शरीरयष्टी पाच वर्षाच्या बालका सारखी होती, जन्मतः ही मुल रडले नाही तर त्याच्या मुखातून ‘राम’ हे नाम आले. अशा अद्भुत परंतु दुश्चीन्हांमुळे आई-वडिलांनी त्या मुलाला सुवर्णदानासह चुनिया नामक दासीला देऊन टाकले. नंतर मुलाची माता हुलसी हिचे निधन झाले. चुनिया दासीने मुलाचा पाच वर्षे सांभाळ केला. नंतर तिचा देखील मृत्यू झाला. हा बालक एकाकी जीवन जगत होता, तेव्हा स्वतः जगज्जननी पार्वतीने एका ब्राह्मण स्त्रीच्या वेशात येऊन त्या मुलाला नरसिंहदास या साधूच्या स्वाधीन केले. त्याने त्या मुलाचे संगोपन केले. पुढे श्री शिवशंकराने नरहर्यानंदांना दृष्टांत देऊन त्या मुलाचे उपनयन करण्यास सांगितले. उपनयनानंतर मुलाचे नाव रामबोला ठेवण्यात आले. तेच तुलसीदास.

अध्ययन : अयोध्येत बारा वर्षे श्री गुरूच्या सान्निध्यात राहून त्यांनी वेदशास्त्रांचे अध्ययन पूर्ण केले. नंतर ते हस्तिनापुरास गेले. आत्माराम दुबे या त्यांच्या वडिलांची तेथे भेट झाली. आत्माराम अकबर दरबारी होते, ते एकदा तुलसीदासाला अकबरा कडे घेऊन गेले. अकबर बादशहाची तुलसीदासावर खूपच मर्जी बसली. बादशहा तुलसीदासाला शिकारीसाठी आपल्याबरोबर घेऊन जात असे.

वैवाहिक जीवन आणि वैराग्य : तुलसीदासांचे वडील आत्माराम यांनी तुलसीदासाचे एका श्रीमंताच्या मुलीशी डामडौलाने लग्न लावून दिले, तिचे नाव रत्नावली होते. त्या दोघा पती-पत्नीचे एकमेकांवर अतिशयच प्रेम जडले. तुलसीदास यांना तिच्यावाचून घटकाभरही चैन पडत नसे.

एके दिवशी तुलसीदास अकबर बादशहाबरोबर दूरच्या देशी गेले असता रत्नावली बोलावणे आल्यामुळे माहेरी गेली. तुलसीदास घरी परतले तेव्हा रत्नावली माहेरी गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. ते तसेच सासुरवाडीस जाण्यास निघाले. तिथे पोहोचेपर्यंत दोन प्रहर रात्र झाली. घरातील सर्व माणसे दारे लावून झोपी गेली होती. तुलसीदास विचार करू लागले. आत प्रवेश कसा करावा? रत्नावलीस भेटण्यास ते अगदी उत्सुक झाले होते. एक सर्प खिडकीस वेढा देऊन लोंबत असलेला त्यांच्या दृष्टीस पडला. त्याला धरून तुलसीदास आत गेले. घरातील माणसे जागी झाली. तुलसीदास आल्याचे रत्नावलीस तिच्या आईने सांगितले. ती तुलसीदासांकडे आली व म्हणाली, ”सारे दरवाजे बंद असता आपण आत कसे आलात?” यावर तुलसीदास म्हणाले, ”तू जो दोर मला आत येण्यासाठी लोंबत ठेवला होतास, त्या दोराला धरून मी आलो.” हे ऐकून रत्नावलीस नवल वाटले. ती खिडकीपाशी जाऊन पाहते तो एक मोठा सर्प लोंबत असलेला तिच्या दृष्टीस पडला. तेव्हा ती तुलसीदासांना म्हणाली, ”प्राणनाथ, तुम्ही माझ्यावर जेवढ प्रेम करता, तेवढ जर श्रीरामाच्या ठायी ठेवाल, तर तुमच्या जन्माचे सार्थक होईल.” ते तीचे उद्गार ऐकून तुलसीदास विरक्त झाले. त्यांच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले. ते तसेच तिथून निघाले. आनंदवनास गेले. तिथे त्यांनी बारा वर्षे तपश्चर्या केली. नंतर ते रामकथा कथन करू लागले.

राम दर्शनाची ओढ : एकदा तुलसीदासांना पिशाच्च भेटले. पिशाच्चाने ”तुला काय हवे?” म्हणून तुलसीदासांना विचारले. ”रामाची भेट करून दे.” असे तुलसीदासांनी सांगताच ते पिशाच्च मागे मागे जाऊ लागले. दूर जाऊन त्यांना म्हणाले, ”तू ज्या ठिकाणी पुराण ऐकावयास जातोस, तिथे एक म्हातारा ब्राह्मण हातात काठी घेऊन सर्वांच्या आधी येऊन बसतो व सर्वजण गेल्यावर निघून जातो. तो तुला रामाची भेट करवील. तो प्रत्यक्ष हनुमान आहे.” असे सांगून पिशाच्च अदृश्य झाले.

दुसर्‍या दिवशी पुराण आटोपल्यानंतर तो ब्राह्मण जात असता तुलसीदासांनी त्याला मार्गात गाठून साष्टांग नमस्कार घातला. ”मी गरीब ब्राह्मण आहे. तुला देण्याकरता माझ्याजवळ काही नाही.” असे ब्राह्मणाने म्हणताच तुलसीदास म्हणाले, ”तुम्ही हनुमान आहात. श्रीरामाचे दर्शन तुम्ही मला करून द्यावे.” वाल्मिकीने अवतार घेतलेला हा तुलसीदास आहे, असे हनुमंताने ओळखले. त्यांना हनुमंताने प्रेमाने आलिंगन दिले. लवकरच श्रीरामाची भेट करवितो असे सांगून हनुमान अदृश्य झाले. हनुमंताने श्रीरामचंद्रांना सांगितले, ”तुमच्या आज्ञेवरून वाल्मिकीने तुलसीदास या नावाने अवतार घेतला आहे. त्यांना तुमच्या दर्शनाची तळमळ लागली आहे.” तेव्हा प्रभू रामचंद्रांनी तुलसीदासांना वाल्मिकींनी वर्णन केलेल्या रुपात दर्शन देऊन आलिंगन दिले. त्यांच्या मस्तकावर हात ठेवून ते अदृश्य झाले.

रचना : तुलसीदासांना कवी म्हणून हिंदी साहित्यात श्रेष्ठ स्थान आहे. तुलसीदासाएवढा दुसरा कोणी लोकप्रिय कवी भारतात मध्ययुगात झालेला नाही. त्यांच्या रचनांनी  गरीबाच्या झोपडीपासून श्रीमंताच्या महालापर्यंत सगळीकडे सारखाच प्रवेश केला आहे. 

ते रामचरितमानस, अयोध्याकांड, सुंदरकांड इत्यादी महान आध्यात्मिक ग्रंथांचे रचयिते आहेत.

“ हनुमान चालीसा” ची रचना तुलसीदासांनी केली. तुलसीदास यांना हनुमंताने विनयपदे लिहिण्याची आज्ञा केली. ती मान्य करून त्यांनी ‘विनय-पत्रिका’ नामक श्रेष्ठ काव्य रचिले.संत तुलसीदास यांनी वाल्मिकी रामायणाला हिंदी पेहराव चढविला. तेच आहे तुलसीदासकृत ”श्रीरामचरितमानस’.’इ.सन १५७४ (संवत १६३१) च्या रामनवमी या दिवशी तुलसीदासांनी ‘श्रीरामचरितमानस’ लिहिण्यास प्रारंभ केला.  इ. सन १५७६ (संवत १६३३) ला श्रीराम-सीता विवाहदिनी सातही कांडे पूर्ण लिहून झाली.भगवान श्रीरामाच्या आज्ञेनुसार तुलसीदासांनी काशीला जाऊन श्री विश्वनाथ व अन्नपूर्णेला आपले काव्य वाचून दाखविले व ग्रंथ विश्वनाथाच्या मंदिराच्या गाभार्‍यात ठेवला. दुसर्‍या दिवशी ग्रंथावर ‘सत्यं शिवं सुंदरम’ असे लिहिलेले व त्याखाली ‘श्री शंकर’ ही अक्षरे दिसली.

प्रत्यक्ष भगवंतच रक्षक : तुलसीदासांचे हे काव्य नष्ट करण्याचे काही दुष्टांनी प्रयत्न केले. तो ग्रंथ चोरण्यासाठी त्यांच्या घरी चोरांनाही पाठविण्यात आले. पण दोन धनुर्धर तेथे पहारा देताना त्यांना दिसले. ते बघून चोर पळून गेले. तुलसीदासांनी नंतर तो ग्रंथ आपले जिवलग मित्र तोडरमल यांच्याकडे ठेवला.

अवतारकार्य : तुलसीदास यांनी भारतभ्रमण केले. तत्कालीन हिंदु समाजावर झालेले आक्रमण पाहून ते अतिशय दुःखी झाले. त्यानी भारतातील सर्व राजांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. सामान्य लोकांमध्येही त्यानी जनजागृती केली. तुलसीदासांनी रामलीला नाट्य-प्रकारची सुरुवात केली.

तुलसीदासांची शिकवण : तुलसीदासांच्या भक्तीमध्ये विनयाला पराकोटीचे स्थान आहे. अहंकार नष्ट होऊन   विनम्र झाल्याशिवाय भक्तीतील आनंद अनुभवता येत नाही, अशी त्यांची श्रद्धा आहे. या अहंकाराच्या नाशासाठी आत्मपरिक्षण करून आपल्यातील दोष नष्ट करून आणि गुणवृद्धी करून घेणे आवश्यक आहे. भक्तीसाठी सत्संग, ज्ञान, वैराग्य, तप. संयम, श्रद्धा, प्रेम, भगवत्‌कृपा, शरणागती या गोष्टीही महत्त्वाच्या मानल्या आहेत. एका तऱ्हेने तुलसीदासांच्या भक्ताचे व्यक्तिमत्त्व एका आदर्श मानवाचे व्यक्तिमत्त्व होऊन जाते.

अशीच साधना ही सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांनी सांगितली असून त्यानुसार साधक प्रयत्न करून आपली प्रगती करत आहेत.

श्रीराम चरणी विलीन : श्रावण वद्य तृतीय, देहत्याग इ.सन ३० जुलै १६२३ ( विक्रम संवत १६८०) तुलसीदासांनी आसी घाटावर श्रीराम नाम घेत देह ठेवला.

संकलक : प्रा. विठ्ठल जाधव ,संपर्क : ७०३८७१३८८३

 

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

June 8, 2026

June 8, 2026

June 8, 2026

June 7, 2026

June 7, 2026

June 7, 2026