पुणे, जून : सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट अंतर्गत कार्यरत अमनोरा अचिव्हर्स चॅप्टरच्या वतीने येरवडा येथील खुले कारागृह परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात विविध प्रजातींच्या ५५ वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमास येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक शामकांत शेडगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टचे पूर्व विभाग प्रमुख राजेंद्र कोते, उपविभाग प्रमुख सूरज गायकवाड, अमनोरा अचिव्हर्स चॅप्टरच्या अध्यक्षा माया तुळपुळे, सचिव धनंजय तुळपुळे, सुधीर गांगर्डे, कोषाध्यक्ष सुमित मुगावे, निशा श्रेयकर तसेच विविध विभागांतील उद्योजक, कारागृह अधिकारी व अमनोरा अचिव्हर्स चॅप्टरचे सुमारे ३० सदस्य उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत बहावा, मोहोगनी, बेल, कडुनिंब, कपूर, आपटा आदी पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
यावेळी अधीक्षक शामकांत शेडगे यांनी सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या सामाजिक आणि पर्यावरणपूरक कार्याचे कौतुक केले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान उद्योजक गिरीश देशमुख यांनी खुले कारागृहासाठी गवत कापण्याचे यंत्र भेट दिले. तसेच वृक्षांना नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी अमोल सदानशिवे यांच्या माध्यमातून सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे पाण्याची साठवण टाकी उपलब्ध करून देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गांगर्डे यांनी केले. पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टीने हा उपक्रम यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





