तुळजापूर : शहरातील एमडी ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी विनोद उर्फ पिंटू गंगणे याला आज धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठवले. सहा दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर गंगणेला न्यायाधीश श्रीमती मिटकरी यांच्यासमोर हजर करण्यात आले होते.
आजच्या सुनावणीदरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. गंगणेच्या वकिलांनी त्याच्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत जामिनासाठी अर्ज दाखल केला. गंगणेला किडनी, छाती आणि पोटदुखीचा त्रास असून, दोन दिवसांपूर्वी त्याला उपचारासाठी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते, असे न्यायालयात सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, याच वैद्यकीय कारणांचा दाखला देत पोलिसांनी गंगणेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली नाही. मात्र, गरज भासल्यास पुन्हा पोलीस कोठडी मागण्याच्या अटीवर त्याला तात्पुरती न्यायालयीन कोठडी (MCR) देण्याची विनंती केली. यामुळे आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपाला पुन्हा बळ मिळाले आहे.
सरकारी वकील ॲड. जयंत देशमुख यांनी सरकारच्या वतीने जोरदार युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय जामीन अर्जावर निर्णय देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात पिंटू गंगणे याने ‘गोपनीय बातमीदार’ म्हणून पोलिसांना मदत केल्याचे फिर्यादी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, यांनी आपल्या जबाबात म्हटले होते. गंगणे व्यसनातून बाहेर पडून इतर तरुणांना वाचवण्यासाठी पोलिसांना मदत करत असल्याचेही सांगितले होते. मात्र, आता तोच या प्रकरणातील प्रमुख आरोपी बनल्याने आणि पोलीस त्याच्या कोठडीसाठी आग्रही नसल्याने संपूर्ण प्रकरणाच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.