यवतमध्ये धक्कादायक घटना : मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पत्नीला पतीकडून जबरदस्ती; चौघे अटकेत

यवत : दौंड तालुक्यातील एका महिलेला तिच्या पतीने स्वतःच्या तीन मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पतीसह त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या पतीसोबत भरतगाव येथे राहत होती. २०२३ पासून ते एप्रिल २०२५ पर्यंत तिच्यावर वेळोवेळी मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. तिच्या इच्छेविरुद्ध, तिला घरी आणि शेतात पतीच्या तीन मित्रांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले गेले.

या गंभीर प्रकारामुळे त्रस्त झालेल्या पीडितेने अखेर यवत पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. यवत पोलिसांनी या चारही आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.