Satyajit Singh Patankar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शरद पवार (Sharad Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. साताऱ्यातील पाटण तालुक्यातील सत्यजितसिंह पाटणकर (Satyajit Singh Patankar) आज (10 जून) सकाळी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
सत्यजितसिंह पाटणकर आज भाजपात आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत पक्षप्रवेश करणार आहे. भाजप कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थित सत्यजितसिंह पाटणकरांचा भाजपात पक्षप्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापनदिन आहे. मात्र यावर्धापनदिनी भाजपकडून शरद पवारांना धक्का देण्यात आला आहे. 26 मे 2025 रोजी पाटणमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत सत्यजित सिंह पाटणकर यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आज सत्यजितसिंह पाटणकर भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. सत्यजितसिंह पाटणकरांच्या भाजपाप्रवेशामुळे पाटणमध्ये हा नवा राजकीय भूकंप असल्याचे बोलले जात आहे.
पाटण विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार हर्षद कदम, अपक्ष उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांच्यात लढत झाली होती. हर्षद कदम ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असले तरी प्रामुख्यानं लढत शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजितसिंह पाटणकर अशी झाली. या लढतीत शंभूराज देसाई यांनी विजय मिळवला.शंभूराज देसाई यांना 125759 मतं मिळाली. तर, सत्यजितसिंह पाटणकर यांना 90935 मतं मिळाली. हर्षद कदम यांना 9626 मतं मिळाली. तर,शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांचा 34824 मतांनी पराभव केला.
सातारा जिल्ह्यातील पाटणमध्ये गेली अनेक दशके देसई आणि पाटणकर घराण्यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र 2014 पासून शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात सलग विजय मिळवत सत्यजितसिंह पाटणकरांचा प्रभाव कमी केला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत देखील शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकरांचा पराभव केला होता.
पाटण विधानसभा मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रमसिंह पाटणकर यांनी शंभूराज देसाई यांना पराभूत केलं होतं. त्यानंतर 2014 ची निवडणूक सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली. यावेळी शंभूराज देसाई यांनी विक्रमसिंह पाटणकर यांचा पराभव केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सत्यजितसिंह पाटणकर यांनी शंभूराज देसाईंविरुद्ध निवडणूक लढवली. शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना पराभूत करत विजय मिळवला होता. 2024 मध्ये देखील शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांचा पराभव केला.