पुणे : वीरा मिस अँड मिसेस महाराष्ट्र आणि द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत कर्करोग जनजागृती तसेच कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रणरागिणी महिलांना समर्पित असलेला हा विशेष उपक्रम पुण्यात मोठ्या दिमाखात पार पडणार आहे.
या पत्रकार परिषदेत आयोजकांनी शोची संकल्पना, उद्दिष्टे आणि कार्यक्रमाची रूपरेषा याविषयी माहिती दिली. ३० आणि ३१ मे रोजी ग्रँड तमन्ना हॉटेल, फेज २, हिंजवडी येथे हा भव्य फॅशन शो मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला असून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती आयोजक डॉ. अंजली आवटे आणि रामकुमार शेडगे यांनी दिली.
फॅशन, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम घडवणारा हा शो महिलांच्या संघर्षाला सलाम करणारा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कर्करोगाबाबत जनजागृती निर्माण करण्यासोबतच कर्करोगाशी लढणाऱ्या महिलांच्या जिद्दीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
पत्रकार परिषदेला प्रसिद्ध मॉडेल व स्किनतज्ञ डॉ. अंजली आवटे, डॉ. संदीप आवटे, चित्रपट लेखक-दिग्दर्शक रामकुमार शेडगे, पायल प्रामाणिक, डॉ. प्रीती गुप्ते, डॉ. प्रतिभा लबडे, डॉ. जबीन पठाण, सारिका बोऱ्हाडे,
डॉ. अश्विनी नवले, नितीन झगरे, आकाश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या शो बद्दल पुणेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून हा फॅशन शो सामाजिक संदेश देणारा वेगळा उपक्रम ठरणार असल्याची चर्चा आहे.





