Pune News : राजगडातील बालेकिल्ल्यावरुन 400 फूट खाली पडली, पुण्यात 21 वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

Pune News : राजगड किल्ल्यातील अतिदुर्गम बालेकिल्ल्यावरून सुमारे 400 फूट खाली कोसळल्यामुळे पुण्यातील 21 वर्षीय पर्यटक महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे दाम्पत्य राजगडावर फिरायला आले असताना ही दुर्घटना घडली.

कोमल शिंदे (वय 21 वर्ष, रा. आळंदी, पुणे) असे मयत विवाहित महिलेचे नाव आहे. गुरुवार 5 जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वेल्हे पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कोमल शिंदे आणि तिचे पती गुरुवारी दुपारी राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आले होते. दुपारी पडलेल्या पावसामुळे किल्ल्याच्या पायवाटा निसरड्या झाल्या होत्या. सायंकाळी कोमल बालेकिल्ल्याच्या खडतर वाटेवरून खाली कोसळली. ती संजीवनी आणि सुवेळा माचीच्या पायथ्याशी पडली.

खडकावर आपटल्याने तिच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली, आणि जोरदार रक्तस्रावामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक कार्यकर्ते संकेत खरात आणि रामभाऊ ढेबे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कोमल हिचा मृतदेह गडाच्या पद्मावती माचीवरील राजसदरेच्या प्रांगणात आणला. गडाचे सुरक्षा रक्षक विशाल पिलावरे यांनी सांगितले की, कोमल चढताना की उतरताना पडल्या याची स्पष्ट माहिती नाही.

वेल्हे पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार ज्ञानदीप धिवार यांनी सांगितले की, सायंकाळी 5.15 वाजताच्या सुमारास त्यांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस अंमलदार पी.एच. सुर्यवंशी, स्थानिक पोलीस पाटील विश्वास शिर्के, पुरातत्व विभागाचे पाहरेकरी बापू साबळे आणि हवेली तालुका आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू पथकाचे तानाजी भोसले यांनी तातडीने राजगड गाठले.

रात्री उशिरा मृतदेह खाली आणण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, तपास सुरू आहे.