Gujarat Plane Crash : अहमदाबादमधील विमानतळाजवळ एअर इंडियाचे विमान आज ( दि. १२ जून ) दुपारी कोसळले. काळजाचा थरकाप उडविणार्या या भीषण अपघाताची दृश्य कॅमेर्यात कैद झाली असून, व्हायरल व्हिडिओमध्ये विमान वेगाने खाली येत दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, विमान कोसळल्यानंतर परिसराला धुराच्या लाेटाने व्यापल्याचे दिसत आहे.
एअर इंडियाचे विमान क्रमांक AI-171 दुपारी १.३८ वाजता उड्डाण केले. गुजरातमधील अहमदाबादमधील मेघानी नगर येथील निवासी भागात दुपारी १.४० वाजता विमान विमानतळ कॅम्पसला लागून असलेल्या एअर कस्टम कार्गो ऑफिसजवळ कोसळले. उड्डाणानंतर अवघ्या दोन मिनिटांमध्ये विमान कोसळले. संपूर्ण परिसरात धुराचे लोट दिसले.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये विमान वेगाने खाली येत दिसत आहे. विमान कोसळल्यानंतर परिसरात धुराचे लोट दिसत आहेत.
विमान निवासी भागात कोसळल्याने एकच खळबळ उडाली. परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्तसंस्था ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, विमानात २४२ प्रवासी असण्याची शक्यता आहे. विमान विमानतळाच्या भिंतीवर आदळले असल्याचे मानले जात आहे. अग्निशमन दलासह रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहने घटनास्थळी धाव घेतली.
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, AI 171 हे विमान अहमदाबादहून लंडनमधील गॅटविक विमानतळाच्या निघाले होते. विमानात एकूण 242 जण होते. यात 10 कॅबिन क्रू आणि 2 वैमानिकांचा समावेश आहे. कॅप्टन सुमित सब्रवाल आणि क्लाईव कुंदर अशी वैमानिकांची नावे आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून अपघातात जीवितहानी झाली आहे का, जखमींची संख्या किती याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, घटनास्थळावरील दृश्य पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. निवासी भागात विमान कोसळल्याने परिसरात हा आकडा आणखी वाढेल, असा अंदाजही वर्तवला जातोय.
विमान अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडला असावा, असा अंदाज हवाई वाहतूक तज्ज्ञांनी वर्तवला आहे. दुसरीकडे अपघाताचे वृत्त समजताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांशी दुरध्वनीवरून चर्चा केली आहे. बचावकार्यात केंद्र सरकारच्या मदतीची तयारीही दर्शवली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतची पोस्ट X वर (पूर्वीचे ट्विटर) टाकली आहे.