Video : सडलेले पाव हॉटेलमध्ये वापरले जातअसल्याचा धक्कादायक प्रकार; व्हिडीओ व्हायरल
मुंबई : मुंबईत हॉटेल आणि बेकऱ्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खराब, सडलेले आणि कीड लागलेले जुने पाव एकत्र करून त्यांची पावडर तयार केली जाते आणि हीच पावडर हॉटेलमध्ये ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या चटण्या व ग्रेव्हीमध्ये वापरली जाते, असा आरोप करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर व उपनगरांमधून हजारोंच्या संख्येने खराब झालेले, १५-२० दिवस जुन्या अवस्थेतील पाव गोळा केले जातात. हे पाव अनेकदा सडलेले असतात, त्यावर कीड पडलेली असते आणि ते आरोग्यास अत्यंत घातक असतात. अशा पावांपासून एक किलो वजनाची पावडर तयार केली जाते आणि ती स्थानिक हॉटेलांना विकली जाते.
या पावडरचा वापर विविध खाद्यपदार्थांच्या तयारीत – विशेषतः चटणी आणि ग्रेव्हीमध्ये – मोठ्या प्रमाणावर केला जातो. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे प्रशासनही खडबडून जागं झालं आहे.
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित हॉटेल्स आणि पाव पुरवठादारांवर लवकरच कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.