भारतीय शास्त्रीय नृत्याचे आध्यात्मिक महत्त्व जाणा !

नृत्य हे केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून साधना केली, तर ईश्‍वरापर्यंत जाता येते !

भारतीय शास्त्रीय नृत्याचे आध्यात्मिक महत्त्व जाणा ! 

प्रस्तावना – नृत्याची निर्मिती झाली, तेव्हा ‘ईश्‍वराची आराधना’ म्हणून नृत्य सादर केले जाई. पुढे अशा पद्धतीने सादर केल्या जाणार्‍या नृत्याचा हळूहळू र्‍हास होत गेला. पुढे कला म्हणून आणि आता केवळ मनोरंजन अन् अर्थार्जन यांसाठी नृत्याचा वापर होऊ लागला आहे. आजकाल तर बहुतांश जण लोकेषणेच्या आहारी जाऊन मूळ तत्त्वालाच विसरले आहेत. याच मूळ तत्त्वाच्या, मूळ स्वरूपाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘नृत्याच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती’ हा दृष्टीकोन सर्वांसमोर मांडला. नृत्य शिकतांना ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी नृत्यकला’ हा दृष्टीकोन असणे आवश्यक आहे. आपल्या संस्कृतीतील नृत्यकला ही मंदिरातच निर्माण झाली आहे. उपासनेचे माध्यम म्हणूनच ती विकसित झाली आहे. नृत्य या वरवर मनोरंजनात्मक वाटणार्‍या कृतीकडेही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेच्या अंगाने पहायला शिकवले. आज समाजात नृत्य, गायन यांसारख्या कलांचे विकृतीकरण झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनचे साधक करत असलेले हे अमूल्य संशोधन अवघ्या विश्‍वासाठी मार्गदर्शक आहे. नृत्यकलेविषयी संशोधन करतांना ‘नृत्य हे केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून साधना केली, तर ईश्‍वरापर्यंत जाता येते. ‘नृत्याच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती’ कशी करायची तसेच नृत्याच्या माध्यमातून येणार्‍या अनुभूती आणि त्याचे होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक परिणाम यांचा अभ्यास याविषयी या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात !

‘जगभरातील जिज्ञासूंना अध्यात्म अन् साधना यांचे महत्त्व समजावे आणि सर्वांनी स्वतः साधना करून आनंदप्राप्ती करून घ्यावी, यांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आधुनिक वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्म अन् साधना समजावून सांगतात. यासाठी वर्ष २०१४ पासून ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफिक स्कॅनिंग’, ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’, ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी (पी.आय.पी.)’, ‘थर्मल इमेजिंग’, ‘गॅस डिस्चार्ज व्हिजुअलायझेशन (जी.डी.व्ही.)’ इत्यादी वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून आध्यात्मिक संशोधन करण्यात येत आहे. या संशोधनकार्याला स्थूल पंचज्ञानेंद्रिये (डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा), मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील ज्ञानाची, म्हणजे ‘सूक्ष्म परीक्षणा’ची (टीप) जोड देऊन या संशोधनाचे विश्लेषणही करण्यात येत आहे.

टीप – स्थूल पंचज्ञानेंद्रिये (डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा), मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’ ! एखाद्या घटनेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.

१. ईश्वरप्राप्ती हे सर्व कलांचे अंतिम साध्य !

   ‘भारतीय शास्त्रीय नृत्यातून निर्माण होणार्‍या लयबद्ध नादलहरींमध्ये देवतेला स्पर्श करून तिला जागृत करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे नृत्यातून साधना करणार्‍या जिवाला ईश्वरापर्यंत जलद पोचता येते. चित्रकला, संगीत, नृत्य आदी सर्व कलांची निर्मिती ईश्वरापासून झाली आहे. त्यामुळे ईश्वराची (सर्वाेच्च आणि सातत्याने मिळणार्‍या आनंदाची) अनुभूती घेता येणे, हे या सर्व कलांचे अंतिम साध्य आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने भारतीय शास्त्रीय नृत्य, तसेच पाश्चात्त्य नृत्य यांच्या संदर्भात विपुल संशोधन करण्यात आले आहे.

   ‘व्यक्तीने नृत्य केल्यावर तिच्या सूक्ष्म-ऊर्जेवर (‘ऑरा’वर) काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे काही चाचण्या करण्यात आल्या. या उपकरणाद्वारे वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा मोजता येते. या चाचण्यांतील नोंदी पुढे दिल्या आहेत.

१. चाचण्यांतील नोंदी

  व्यक्तीतील नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ (मीटर)

 

व्यक्तीतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ (मीटर)

 

  नृत्य करण्यापूर्वी नृत्य केल्यानंतर नृत्य करण्यापूर्वी नृत्य केल्यानंतर
अ. व्यक्तीने ‘सालसा’ हे पाश्चात्त्य नृत्य करणे
१. पहिली व्यक्ती ६.१० ११.७४ २.४२
२. दुसरी व्यक्ती ४.७२ १५.७० ३.२८
         
आ. व्यक्तीने ‘बेलीडान्स्’ हे पाश्चात्त्य नृत्य करणे
१. पहिली व्यक्ती ५.७५ १८.३२ १.५५
२. दुसरी व्यक्ती ४.५४ १४.२४ १.६०
         
इ. व्यक्तीने ‘भरतनाट्यम्’ हे भारतीय शास्त्रीय नृत्य करणे
१. पहिली व्यक्ती ४.९० १.५५ ३.०५ ५.९४
२. दुसरी व्यक्ती २.६५ ४.२० ६.४५
         
ई. व्यक्तीने ‘कथ्थक’ हे भारतीय शास्त्रीय नृत्य करणे
१. पहिली व्यक्ती १०.८९ ४.३५ १.६३ ४.८७
२. दुसरी व्यक्ती ५.१६ ३.०२ ३.७६ ६.४४

 

वरील नोंदींतून दिसून आले की, व्यक्तींनी भारतीय शास्त्रीय नृत्य केल्यानंतर त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प किंवा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली. याउलट त्यांनी पाश्चात्त्य नृत्य केल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली.

२. निष्कर्ष : यातून ‘भारतीय शास्त्रीय नृत्य केल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर सकारात्मक परिणाम होतो आणि तिने पाश्चात्त्य नृत्य केल्यावर तिच्या सूक्ष्म-ऊर्जेवर नकारात्मक परिणाम होतो’, हे लक्षात आले.

३. पाश्चात्त्य नृत्यातून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होणे : पाश्चात्त्य नृत्यप्रकारांना आध्यात्मिक पाया नाही. हे नृत्यप्रकार आणि त्यांच्याशी संबंधित घटक (उदा. वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा, पाश्चात्त्य संगीत इत्यादी) असात्त्विक असल्याने त्यांतून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित झाली. या नृत्यात सहभागी झालेल्या व्यक्तींनी सांगितले, ‘हे नृत्य केल्यानंतर त्यांना शारीरिक थकवा येणे, डोके दुखणे, काही न सुचणे इत्यादी त्रास झाले.’

४. भारतीय शास्त्रीय नृत्यातून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होणे : भारतीय शास्त्रीय नृत्याला आध्यात्मिक पाया आहे. भरतनाट्यम्, कथ्थक इत्यादी नृत्यप्रकार सादर करतांना सात्त्विक वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा यांचा अंतर्भाव असून त्यांना सात्त्विक शास्त्रीय संगीताची जोड दिली जाते. या नृत्यांतील पदन्यास, तसेच हातांच्या मुद्रा या सात्त्विक अन् लयबद्ध आहेत. ही नृत्ये देवतांच्या कथांवर आधारित किंवा देवतांशी संबंधित असल्याने नृत्य करणार्‍याच्या मनात आणि मुखावर सात्त्विक भाव असतात. नृत्याच्या माध्यमातून ईश्वराशी अनुसंधान साधले जात असल्याने नृत्य करणार्‍याला त्याच्या भावानुसार आध्यात्मिक अनुभूती येतात. सात्त्विक नृत्यातून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात. त्यामुळे नृत्य करणारा आणि ते पहाणारा यांना आध्यात्मिक लाभ होतात. भारतीय शास्त्रीय नृत्यात सहभागी झालेल्या व्यक्तींनी सांगितले, ‘नृत्य करतांना त्यांना देवीचे अस्तित्व जाणवत होते. तसेच सूक्ष्मातून देवीचे दर्शनही झाले.’

विविध प्रकारच्या भारतीय शास्त्रीय नृत्यातून ईश्‍वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न !

 ‘ओडिसी नृत्यकला’ या नृत्यकलेमध्ये जलद पदन्यास, लवचिक अंगविक्षेप, चपळ हस्तमुद्रा, तोंडवळ्यावर हावभाव करायचे असतात. ही नृत्यकला हठयोग आणि भक्तीयोग यांचा संयोग आहे. ‘कथकली’ या नृत्यकलेत तोंडवळ्यावर लक्ष केंद्रित केलेले असते. विविध भाव दर्शवण्यासाठी तोंडवळ्याची प्रत्येक नस ताणली किंवा आकुंचित केली जाते. हावभावांच्या माध्यमातून भाव अधिक प्रमाणात व्यक्त होतो. भाव व्यक्त करण्यास शरिराच्या हालचालीही पूरक ठरतात. हे व्यक्त भावाचे उत्तम उदाहरण आहे. ‘कुचिपुडी’ नृत्यकलेत तालबद्ध पदन्यास, हस्तमुद्रा आणि तोंडवळ्यावरील हावभाव यांसह नृत्यांगना डोक्यावर घट अन् पाय ताम्हणावर ठेवून स्वतःचा तोल सावरत भूमीवर रचना करते. या सगळ्यामुळे मनाची एकाग्रता साधली जाते. ‘भरतनाट्यम्’ या नृत्यकलेमध्ये तोंडवळ्यावर नवरसांची अभिव्यक्ती केली जाते. कथ्थक’ नृत्यप्रकारात नृत्यांगना भक्तीयोगाच्या पुढच्या टप्प्याकडे म्हणजे अव्यक्त भावाकडे जाण्याचा आणि त्याही पुढे जाऊन ईश्‍वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करते.

   भगवंताशी एकरूपता साधण्यासाठी त्यानेच निर्मिलेल्या विविध कलांपैकी नृत्य ही एक कला आहे. भारतीय शास्त्रीय नृत्य सात्त्विक असल्याने रसिकांनी भारतीय शास्त्रीय नृत्याचा आस्वाद घेतल्यास त्यांना आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ लाभ होऊ शकतो.

मार्गदर्शक परात्पर गुरु डॉ. आठवले, संस्थापक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

संकलक  – सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

स्थानिक संपर्क क्रमांक७०३८७१३८८३