पुणे : हिंदुस्थान अँटीबायोटिक्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक यशवंत घारपुरे यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअर्स (आयआयसीएचई) रिजनल सेंटरच्या वतीने ‘जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या सात दशकांपासून यशवंत घारपुरे यांनी व्यवस्थापन, रासायनिक अभियांत्रिकी व सामाजिक कार्यात योगदान दिले आहे. त्याप्रती कृतज्ञता म्हणून घारपुरे यांना मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) महासंचालक प्रशांत गिरबाने यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
‘आयआयसीएचई’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने गिरबाने यांचे ‘पुण्याची अर्थव्यवस्था : भूत, वर्तमान आणि भविष्य’ यावर बीजभाषण झाले. भांडारकर रस्त्यावरील रविराज हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात ‘आयआयसीएचई’ पुणे रिजनल सेंटरचे अध्यक्ष डॉ. सुयोग तराळकर, मानद सचिव डॉ. उत्कर्ष माहेश्वरी, खजिनदार डॉ. प्रफुल्ल गर्गे आदी उपस्थित होते.
यशवंत घारपुरे म्हणाले, “फक्त ज्ञान घेणे महत्वाचे नाही तर, ते ज्ञान प्रत्यक्षात उतरवून आपल्या देशाच्या उपयोगी पडणे आणि आपण काम करत असलेल्या क्षेत्रामध्ये उन्नती घडविणे सुद्धा महत्वाचे आहे. आपल्यातील कामाची इच्छा आपल्याला नवनव्या संधी उपलब्ध करून देत असते. कामाच्या माध्यमातून मला पर्यटनाची आवड जोपासता आली. शहराच्या विकासात अभियंत्यांना योगदान देण्याची मोठी संधी असते. शहराचा रचनाकार म्हणून तुम्ही योगदान द्या. माझ्या आजवरच्या कार्याचा हा सन्मान असून, यामध्ये कुटुंबियांचेही तितकेच मोलाचे योगदान आहे.”
घारपुरे यांचे मोलाचे योगदान : गिरबाने
“यशवंत घारपुरे यांनी अभियांत्रिकी व उद्योग क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. हिंदुस्थान अँटिबायोटिक्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करताना त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. निवृत्तीनंतरही उद्योगांच्या विकासासाठी इनोव्हेशन, तंत्रज्ञान हस्तांतरण, संशोधन यामध्ये आपल्या ज्ञानाचे योगदान ते देत आहेत. पुण्याच्या प्रगतीसाठी अनेक नवे उपक्रम, कल्पना त्यांनी मांडल्या असून, त्यावर काम झाले आहे,” असे प्रशांत गिरबाने यांनी नमूद केले.