तत्कालीन अधिकारी-पबमालक यांच्या संबंधाच्या सीबीआय चौकशीची वंदे मातरम संघटनेची मागणी

पुणे : माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रात तत्कालीन विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, उपायुक्त माधव जगताप, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता एका पबमालकासोबत दिसून येत आहेत. ही बाब अतिशय खेदजनक असून, राव, कुमार, जगताप व गुप्ता या अधिकाऱ्यांचा पबमालकाशी काय संबंध आहे, याची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत (सीबीआय) चौकशी करावी, अशी मागणी वंदे मातरम संघटनेने पत्रकार परिषदेत केली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष लेशपाल जवळगे यांनी ही पत्रकार परिषद घेतली.
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणामुळे पुणे शहरातील गंभीर परिस्थिती समोर आली आहे. ही परिस्थिती या शहरात टप्प्याटप्प्याने निर्माण झाली असून, सरकारी शाळा, हॉस्पिटल, क्रीडांगणे बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम एका बाजूला सुरु असल्याचे पुरावे वंदे मातरम संघटनेने तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे दिले होते. मात्र, ज्यांनी कारवाई करायला हवी, तेच यात गुंतल्याचे दिसून येत आहे. एका फोटोमध्ये तत्कालीन अधिकारी सौरभ राव, विक्रम कुमार अमिताभ गुप्ता, माधव जगताप हे एका पबमालकासोबत दिसत आहेत. यांच्यात नेमके कोणत्या प्रकारचे संबंध आहेत, याची चौकशी व्हायला हवी.
या तीनही अधिकाऱ्यांचे बिल्डरांसोबत असलेले संबंध आणि यांनी शहराच्या मोक्याच्या जागांबद्दल घेतलेले निर्णय, तसेच पुण्यातील अनधिकृत पब, हॉटेल्स, बांधकामे, दारूची दुकाने अशा व्यवसायांमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या अधिकाऱ्यांचे असलेले संबंध याची चौकशी करायला हवी. या चौकशीतून गेल्या दहा-पंधरा वर्षात या शहराची लूट अधिकारी आणि पुढारी यांनी संगनमताने कशी केली, हे जनतेच्या समोर आले पाहिजे. आजवर शहराची शेकडो कोटींची लूट केली गेली असून, हा विषय मार्गी लावल्याशिवाय वंदे मातरम संघटना गप्प बसणार नाही, असे सचिन जामगे म्हणाले.