पुणे : दी मिस्ट एलजीबीटीक्यू फाऊंडेशनतर्फे आयोजित आठव्या आउट अँड लाऊड पुणे इंटरनॅशनल क्वीर फिल्म फेस्टिव्हलमध्ये (पीआयक्यूएफएफ) व्हॅलेंटाईन@थ्री (बेस्ट ऑफ आऊट अँड लाऊड आणि बेस्ट इंडियन फिचर फिल्म) या सिनेमाने बाजी मारली. ह्यूज अँड ब्ल्यूज (बेस्ट इंडियन डाक्युमेंटरी), एक्सप्लोरिंग आयडेंटिटी-मास्क वर्सेस मास्क (बेस्ट इंटरनॅशनल डॉक्युमेंटरी), लव्ह प्लस (बेस्ट इंडियन शॉर्टफिल्म), एव्हरीथिंग इज इझी एव्हरीथिंग इज हार्ड (बेस्ट इंटरनॅशनल शॉर्टफिल्म) व एव्हरीथिंग ऑफ व्हॅल्यू ( बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म) यांनीही पुरस्कार पटकावले.
‘पीआयक्यूएफएफ’मध्ये एलजीबीटीक्यू समुदायासाठी पूरक कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला. ट्विट फाउंडेशनच्या संचालक माया अवस्थी यांना ‘आउट अँड लाऊड वॉरियर ऑफ द इयर २०२४’, झेडएस असोसिएट्सचे अली खान यांना ‘आउट अँड लाऊड वर्कप्लेस अॅडव्होकेट ऑफ द इयर २०२४’, आयएचसीएलच्या सहयोगी संचालक सुमेक्षा भट यांना ‘आउट अँड लाऊड अलाय (मित्र) ऑफ द इयर २०२४’, द इंडियन एक्सप्रेसच्या वरिष्ठ पत्रकार अमृता प्रसाद यांना ‘आउट अँड लाऊड जर्नालिस्ट ऑफ द इयर २०२४’, तर आयबीएम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना ‘आउट अँड लाऊड ऑर्गनायझेशन ऑफ द इयर २०२४’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
बोट क्लब रस्त्यावरील गोएथे इन्स्टिट्यूटमध्ये (मॅक्समुलर भवन) आयोजित महोत्सवात एलजीबीटीक्यू+ समुदायातील वैविध्यपूर्ण कथा आणि दृष्टीकोन असलेल्या ४३ आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपटांचे स्क्रीनिंग झाले. याला जगभरातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी झालेल्या परिसंवादात ‘आयबीएम’च्या प्रतिनिधी प्रीती जैन, दिग्दर्शक फराज अरिफ अन्सारी, झेडएस असोसिएट्सचे अली खान, मिस्ट एलजीबीटीक्यू फाउंडेशनचे संस्थापक श्याम कोन्नूर यांनी सहभाग घेतला.
श्याम कोन्नूर म्हणाले, “हा चित्रपट महोत्सव केवळ एक कार्यक्रम नव्हे, तर ओळख, विविधतेचा आणि ज्वलंत उत्सव होता. सिनेमा हा आपल्या समुदायाला एकत्र करतो आणि व्यासपीठासाठी पात्र असलेल्या कथा सादर करतो.” ‘पीआयक्यूएफएफ’चे संचालक श्रीराम श्रीधर यांनी महोत्सवाच्या यशावर भाष्य केले. यावेळी एलजीबीटीक्यू समुदायातील सदस्यांनी सामाजिक व सांस्कृतिक कलांचे सादरीकरण केले.