सूर्या मदर अँड चाईल्ड हॉस्पिटलची ‘दूध दान जागरूकता’ मोहिम

पुणे, जून,२०२४: नवजात बालके आणि लहान मुलांसाठी स्तन दूध हा पोषणाचा प्राथमिक व सर्वोच्च स्रोत असतो. बाळाच्या निरोगी वाढीसाठी स्तन दूध आवश्यक असते, त्यामुळे बाळाचे संसर्ग आणि आजारांपासून रक्षण होते. स्तन दूध उपलब्ध नसल्यास दात्याकडून दिले गेलेले दूध हा बाळासाठी दुसरा उत्तम पर्याय असतो. खासकरून नऊ महिने पूर्ण होण्याआधी जन्मलेली बालके किंवा गंभीर आजारी असलेल्या बाळांसाठी हे दूध खूप उपयुक्त ठरते. सूर्या मदर अँड चाईल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने स्तन दूध दान जागरूकता मोहिमेचे आयोजन केले होते. पुण्यातील सूर्या हॉस्पिटलच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाची थीम “दान करण्यात आलेल्या प्रत्येक थेंबामध्ये प्रेम, मिळालेल्या प्रत्येक थेंबामध्ये जीवन”. या मोहिमेचे उदघाटन लॅक्टेशन कन्सल्टन्ट डॉ मनिषा खलाने यांनी केले. स्तन दूध दानाचे महत्त्व अधोरेखित करत दूध दान करणाऱ्या मातांचे कौतुक त्यांनी आपल्या भाषणात केले.

बाळाला जन्मापासून पहिल्या सहा महिन्यांपर्यंत आवश्यक असलेली सर्व पोषके, फॅट्स, कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि पाणी हे सर्व घटक स्तन दुधामध्ये मुबलक प्रमाणात असतात. एनएफएचएसच्या अहवालानुसार, फक्त भारतामध्ये फक्त ४३% बाळांना पहिले सहा महिने फक्त स्तन दूध पाजले जाते. हार्मोनल समस्या किंवा प्रसुतिनंतर झालेला संसर्ग यामुळे काही मातांना दूध येत नाही. ज्या बाळांना त्यांच्या आईकडून स्तन दूध मिळू शकत नाही, ती बाळे आजारी असतील किंवा नऊ महिने पूर्ण होण्याआधीच जन्मलेली असतील तर त्यांच्यासाठी स्तन दूध दान हा पोषणाचा निरंतर स्रोत ठरू शकतो.

दूध दान जागरूकता मोहिमेमध्ये ६७५ पात्र दाता मातांनी उस्फुर्तपणे भाग घेतला होता. या मोहिमेमध्ये सूर्या मदर अँड चाईल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने ५२७ लिटर ९८४ मिली दूध दाता मातांकडून जमा केले, त्यामुळे हॉस्पिटलला ५२५ बाळांना पोषण पुरवण्यात मदत होईल.

डॉ अमिता कौल यांनी स्तन दूध दान करणाऱ्या मातांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. नवजात बालकांना सर्वोच्च देखभाल पुरवण्याच्या रुग्णालयाच्या मिशनमध्ये या माता मौल्यवान भूमिका बजावत असल्याचे डॉ कौल यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “स्तन दूध दान करणाऱ्या मातांची उदारता आणि बांधिलकी यासाठी त्यांच्यापैकी प्रत्येकीचे मी आभार मानते. आमच्या एनआयसीयूमधील लहान बाळांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक पोषण आणि महत्त्वाच्या अँटीबॉडीज तुमच्या योगदानामुळे मिळत आहेत. स्तन दूध हा पोषणाचा उत्तम स्रोत आहे. मानवी दुधामधील चांगले बॅक्टेरिया आणि ऑलिगोसॅचाराइड्स बाळाची पचनसंस्था मजबूत करण्यात आणि तिचे रक्षण करण्यात मदत करत आणि निरोगी पचनाला प्रोत्साहन देतात. स्तन दुधामध्ये असे हार्मोन्स असतात जे बाळाला नीट भूक लागावी यासाठी मदत करतात आणि त्यांचे झोपेचे चक्र विकसित करतात. आज दूध दान मोहिमेत सहभागी झालेली प्रत्येक माता तारणहार आहे आणि त्यांच्या या योगदानामुळे आजच्या विषयाला अर्थ प्राप्त झाला आहे – “दान करण्यात आलेल्या प्रत्येक थेंबामध्ये प्रेम, मिळालेल्या प्रत्येक थेंबामध्ये जीवन”