पुणे ४ जून २०२४: अमोल भोसले यांच्या नेतृत्वाखालील गोल्डन वॉरियर्स ‘अ’ संघाने खडकी पँथर्सचे आव्हान २-१ असे मोडून काढताना हॉकी पुणे वेटरन्स चषक २०२४ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत गोल्डन वॉरियर्स ‘अ’ संघाचा कर्णधार अमोलने तिसऱ्या मिनिटाला त्याच्या टीमचे खाते उघडले. मात्र, पुढच्याच मिनिटाला अमित राजपूतने खडकी पँथर्सला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर कॅप्टन अमोल पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावला. त्याने सातव्या मिनिटाला अप्रतिम गोल करताना गोल्डन वॉरियर्स ‘अ’ संघाला २-१ असे आघाडीवर नेले. हीच आघाडी निर्णायक ठरली.
‘हार्डलाइन्स चषका’साठीच्या लढतीत गोल्डन वॉरियर्स ‘ब’ संघाने हॉकीस्तानीवर ५-३ असा विजय मिळविला. गणेश पिल्लेचा (दुसऱ्या, तिसऱ्या, पाचव्या आणि सहाव्या मिनिटाला) गोल चौकार त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. संघाचा पाचवा गोल कार्टलॉन फर्नांडिसने ११व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकद्वारे केला.
हॉकीस्तानीकडून अमित कासोदेकर (चौथ्या मिनिटाला) आणि रिचर्ड अल्फोन्सने (१४ आणि १५व्या मिनिटाला) गोल करताना सामन्यात रंगत आणली.
स्पर्धेतील सर्व सामने ५ मिनिटांच्या ब्रेकसह प्रत्येकी १० मिनिटांच्या दोन हाफमध्ये (एकुण २० मिनिटे) खेळले गेले.
जुन्या काळातील स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हॉकी पुणेने हॉकी महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात ८० माजी ऑलिंपियन, आंतरराष्ट्रीय आणि खेळाडूंचा समावेश होता.
हॉकी महाराष्ट्रचे सरचिटणीस मनीष आनंद यांच्या हस्ते तसेच हॉकी महाराष्ट्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे, माजी खेळाडू गिल्बर्ट पिंटो आणि हॉकी महाराष्ट्रचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ झाला.
निकाल: अंतिम फेरी: गोल्डन वॉरियर्स ‘अ’: २(अमोल भोसले तिसऱ्या आणि सातव्या मिनिटाला) विजयी वि. खडकी पँथर्स: १(अमित राजपूत चौथ्या मिनिटाला). हाफटाईम: २-१.
तिसरे स्थान: गोल्डन वॉरियर्स ‘बी’: ५(गणेश पिल्ले दुसऱ्या, तिसऱ्या, पाचव्या आणि सहाव्या मिनिटाला; कार्टलॉन फर्नांडिस ११व्या मिनिटाला) विजयी वि. हॉकीस्तानी: ३(अमित कासोदेकर – चौथ्या, रिचर्ड अल्फोन्स १४ आणि १५व्या मिनिटाला). हाफटाईम: ४-१.