BJP : भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला; राजकीय खलबतांना वेग

BJP : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळ्याच वेळणावर गेल्याचं पाहायला मिळालंय. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात जोरदार लढत झाली. 45 पेक्षा जास्त जागांवर निवडून विजयाचा दावा करणाऱ्या महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने तब्बल 30 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे, राज्यातील महायुतीच्या पराभवाचा स्वीकार करुन आपण उपमुख्यमंत्री पदावरुन पायउतार होण्याची इच्छा व्यक्त करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. त्यासाठी, आपण भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला विनंती करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. मात्र, फडणवीसांच्या या निर्णयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांचा हा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे म्हटले.

देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये असायलाच हवेत अशी भूमिका भाजपच्या आमदार व नेत्यांनी घेतली आहे. त्यातच, दुसरीकडे अमरावतीत भाजपच्या (BJP) उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन येथील शहर जिल्हा अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.

हेही वाचा : Lok Sabha Elections : घडामोडींना वेग… काँग्रेसही सत्ता स्थापनेचा दावा करणार, फॉर्म्युला तयार

अमरावती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण पोटे यांनी आपल्या शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला असून येथून काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले आहेत. त्यामुळे, येथील पराभवाची जबाबदारी स्वीकारुन भाजपच्या प्रवीण पोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे, निवडणूक निकालानंतर भाजपात पहिला राजीनामा पडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ”उपरोक्त विषयान्वये, मी अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीमध्ये झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी म्हणून अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. तरी राजीनाम्याचा स्विकार करावा, हि विनंती,” असे पत्र प्रवीण पोटे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांती पराभवाचे परिणाम आता पाहायला मिळत आहेत.

अमरावतीत नवनीत राणा यांना विजयाचा विश्वास होता. त्यामुळे, निवडणुकांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश घेऊन भाजपने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे राणा यांच्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रचारसभा घेतली होती. तर, हिंदू शेरणी म्हणून राणांचा प्रचारही करण्यात आला. मात्र, अमरावतीतील जनतेनं नवनीत राणांना नाकारत काँग्रेसला विजयी केले. दरम्यान, राणा यांच्या उमेदवारीला भाजपमधूनच काही जणांनी विरोध केला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी समजूत घातल्यानंतर भाजपमधील हा विरोध मावळला. तरी, प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी राणांविरुद्ध रणशिंग फुंकले होते. आमदार कडू यांनी राणांविरुद्ध उमेदवारही उभा केला होता.

अमरावतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांचा विजय झाला. त्यांना एकूण 5 लाख 26 हजार 271 मतं मिळाली. दुसरीकडे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना 5 लाख 65 हजार 40 मते मिळाली आहेत. राणा यांचा 19 हजार 731 मतांनी पराभव झाला आहे. महायुतीचा भाग असलेल्या प्रहार जनशक्ती या पक्षानेही अमावतीतून उमेदवार दिला होता. त्यांच्या बळवंत बुब या उमेदवाराला 85 हजार 300 मते मिळाली आहेत. म्हणजेच प्रहार जनशक्तीच्या उमेदवारामुळे राणा यांना मिळणारी मतं फुटली आहेत.

महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या असून महायुतीला केवळ 17 जागा जिंकता आल्या आहेत. सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसने सर्वाधिक 13 जागा जिंकल्या, तर शिवसेना ठाकरे गटाला 9 जागांवर विजय मिळाला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागा जिंकल्या. दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपने सर्वाधिक 9 जागा जिंकल्या, तर शिंदेंच्या शिवसेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 1 जागा जिंकली. दरम्यान, 13 जागांसह राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.