शेअर बाजारासाठी संयम व जोखीम पत्करण्याची मानसिकता हवी

पुणे: “शेअर बाजारात चढ-उतार होत राहतो. बाजार अचानक उसळी घेतो, तर अचानक कोसळतो. हा व्यवसाय अनिश्चित स्वरूपाचा आहे. त्यामुळे शेअर बाजारात व्यवसाय किंवा गुंतवणूक करताना संयम, सामंजस्य व जोखीम पत्करण्याची मानसिकता हवी,” असे प्रतिपादन दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे केंद्रीय उपाध्यक्ष सीए चरणज्योत सिंग नंदा यांनी केले.

‘आयसीएआय’च्या कमिटी ऑफ फायनान्शियल मार्केट्स अँड इनवेस्टर्स प्रोटेक्शन आणि आयसीएआय पुणे शाखेच्या वतीने आयोजित शेअर मार्केटवरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन सीए नंदा यांच्या हस्ते झाले. म्हात्रे पुलाजवळील सिद्धी बँक्वेट येथे झालेल्या कार्यक्रमावेळी ‘सीएफएमआयपी’चे चेअरमन सीए दुर्गेश काबरा, केंद्रीय समिती सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए (डॉ.) राजकुमार अडुकिया, विभागीय समिती सदस्य सीए यशवंत कासार व सीए ऋता चितळे, पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, उपाध्यक्ष सीए सचिन मिनीयार, परिषदेचे समन्वयक सीए जितेंद्र खंडोल, सहसमन्वयक सीए सर्वेश जोशी, आयसीएआय पुणेचे सचिव सीए ऋषिकेश बडवे, कार्यकारिणी सदस्य सीए अजिंक्य रणदिवे, सीए प्रितेश मुनोत, सीए प्रणव आपटे आणि सीए राजेश अग्रवाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या परिषदेत ४०० पेक्षा अधिक सनदी लेखापाल, गुंतवणूकदार, व्यावसायिक, आर्थिक सल्लागार व इतर इच्छूकांनी सहभाग नोंदवला. 

सीए चरणज्योत सिंग नंदा म्हणाले, “शेअर बाजारात येताना केवळ पैसे कमवण्याचा दृष्टिकोन असू नये. भावनांवर संयम असावा. नुकसान झाले, तर खचू नये आणि लाभ झाला, तर हुरळून जाऊ नये. शेअर बाजाराची रचना समजून घेऊन वास्तवात जगावे. शिस्त पाळण्यासह शेअर बाजारातील आपला उद्देश नेमका काय, हे निश्चित करावे.”

सीए दुर्गेश काबरा म्हणाले, “आज देशभरात १ लाख ६० हजार प्रॅक्टीस करणारे सीए आहेत. शेअर बाजारात सीएसाठी विविध संधी आहेत. शेअर मार्केटचा अभ्यास करावा. यात येण्यासाठी ठराविक वेळ नाही. लाभाची अपेक्षा असते, तशी नुकसान सहन करण्याची क्षमता आपल्याकडे असायला हवी.”

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “सामान्य माणूसही शेअर बाजारात पाऊल ठेवत आहे. आर्थिक बाबतीत भारत प्रगतीपथावर असल्याने भारतासह विदेशातील गुंतवणूदारही गुंतवणुकीसाठी पुढे येत आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूक, प्रक्रिया यामध्ये सीए मार्गदर्शक म्हणून महत्वाचा ठरतो.”

सीए (डॉ.) राजकुमार अडुकिया, सीए ऋता चितळे, सीए यशवंत कासार यांनीही आपले विचार मांडले. सीए व्यावसायिक, विद्यार्थी, आर्थिक क्षेत्राशी संबंधित घटकांना मार्गदर्शक अशा उपक्रमांचे संस्थेतर्फे आयोजन करण्यात येत असल्याचे सीए अमृता कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात सांगितले. सीए प्रणव मंत्री यांनी सूत्रसंचालन केले. सीए सचिन मिनीयार यांनी आभार मानले.