सोनाली बेंद्रे सांगते- आम्हा बहिणींपुढे आईने एकच अट ठेवली होती, कोणाशीही लग्न करा पण….

मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने तिच्या अभिनयाने, सोज्वळ चेहऱ्याने आणि गोड हसण्याने देशभरात तिचे चाहते निर्माण केले आहेत. मध्यंतरी बराच काळ ती सिनेसृष्टीपासून दूर होती. तिला झालेला कॅन्सर आणि यशस्वीपणे तिने त्यासाठी दिलेली झुंज यामुळे ती खरोखरच त्या त्रासातून जात असलेल्या अनेकींसाठी प्रेरणादायी ठरली आहे. आता पुन्हा एकदा तिचा एक छोटासा व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये तिच्या आईने तिला जी खास गोष्ट सांगितली होती, ती प्रत्येक मुलीलाच तिच्या आयुष्यात उपयोगी ठरणारी आहे. 

inspireuplift.podcast या सोशल मिडिया हॅण्डलवरून सोनाली बेंद्रेच्या मुलाखतीचा एक छोटासा भाग व्हायरल होत आहे. यामध्ये महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं किती महत्त्वाचं असतं, हे तिच्या आईने तिला कसं पटवून दिलं होतं, याविषयी तिने मोजक्या शब्दांतच खूप छान माहिती दिली आहे.

सोनाली म्हणते की माझ्या आईने आम्हा तिघी बहिणींना एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगितली होती. ती म्हणाली होती की तुम्ही जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाशी लग्न करायचं आहे, असं जरी मला सांगितलं तरी मी त्या गोष्टीला तोपर्यंत मंजूरी देणार नाही, जोपर्यंत तुम्ही स्वत: आर्थिकदृष्ट्या तुमच्या पायावर उभ्या नसाल.. कारण जो पर्यंत आपल्या हातात आपल्या हक्काचा पैसा नसतो, तो पर्यंत आपल्याला आपला आवाज नसतो. आपल्याकडे आत्मविश्वास नसतो. जर आपल्याकडे आपला पैसा नसेल तर मग आपल्याला आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत राहावं लागतं.

त्यामुळे स्वत:च्या आत्मविश्वासासाठी, स्वत:च्या आत्मसन्मानासाठी आपल्याकडे थोडा का होईना पण आपल्या हक्काचा पैसा पाहिजेच पाहिजे. सोनाली बेंद्रेच्या आईने सांगितलेली ही गोष्ट खरंतर आज प्रत्येक आईने तिच्या लेकीला शिकवणं गरजेचं आहे. प्रत्येक मुलगी हे शिकली आणि तिने ते प्रत्यक्षात आणलं तर जग बदलायला वेळ लागणार नाही…