टाटा मोटर्सची प्रमुख एसयूव्ही कार नवीन सफारी आणि हॅरियर ह्या भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम कडून ५- स्टार रेटिंग मिळालेली पहिली वाहने बनली आहेत. भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्रामने २० डिसेंबर रोजी पहिल्या क्रॅश चाचणीचे निकाल जाहीर केले. यात टाटा सफारी आणि हॅरियर या दोन्ही वाहनांना ५-स्टार रेटिंग मिळाले आहे. Bharat-NCAP १५ डिसेंबरपासून दोन्ही कारची क्रॅश चाचणी करत होती.
हॅरियर आणि सफारी या दोन्ही एसयूव्ही कारनी अॅडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन साठी ३२ पैकी ३०.०८ गुण आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शन साठी ४९ पैकी ४४.५४ गुण मिळवले. तसेच या एसयूव्हीनी साइड मूव्हेबल डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टमध्ये १६ पैकी १६ गुण प्राप्त केले. तर फ्रंट ऑफसेट डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टमध्ये छातीच्या भागाच्या सुरक्षिततेसाठी कमी गुण मिळाले. यात १६ पैकी १४.०८ गुण मिळाले.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. वाहन सुरक्षेबाबत भारताची आत्मनिर्भर यंत्रणा असल्याबद्दल त्यांनी भारत-एनसीएपीचे कौतुक केले आणि टाटा मोटर्सचे त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.
ते म्हणाले की, “भारत-एनसीएपी हा वाहन सुरक्षेबाबत भारताचा आत्मनिर्भर आवाज आहे. हे सर्वोत्कृष्ट-श्रेणीतील जागतिक मानकांसाठी बेंचमार्क केलेले आहे आणि भारत-NCAP वाहन रेटिंग प्रणाली अनिवार्य नियमांच्या शिवाय रस्ता सुरक्षा आणि वाहन सुरक्षा मानके पुढे नेण्यासाठी डिझाइन केलेली आहे. मला आनंद होत आहे की ५-स्टार रेटिंगसह प्रमाणित केलेली पहिली वाहने ही दोन्ही टाटा मोटर्सची आहेत. सर्वोच्च संभाव्य रेटिंगसह हे प्रतिष्ठित प्रमाणपत्र बहाल केल्याबद्दल आणि देशातील रस्त्यांवर सर्वात सुरक्षित वाहने सादर करण्याचा त्यांचा वारसा सतत समृद्ध ठेवल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.”
नितीन गडकरी यांनी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांना Bharat-NCAP प्रमाणपत्र प्रदान केले. विशेष बाब म्हणजे या दोन्ही SUV ला ग्लोबल NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये ५-स्टार रेटिंग मिळाले आहे.
दोन्ही SUV कार समान Kryotec २.० लिटर डिझेल इंजिन वापरतात, जे जास्तीत जास्त १७०PS पॉवर आणि ३५०Nm पीक टॉर्क टॉर्क विकसित करते. इंजिन ६-स्पीड MT किंवा ६-स्पीड AT सह जोडले जाऊ शकते.