सिडको परिसरात टोळक्याकडून तलवारी नाचवत गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता पुन्हा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. गावगुंडांनी शहरात पुन्हा दहशत माजवायला सुरुवात केली आहे. तलवारी नाचवत टोळक्याकडून सिडको (Cidco) परिसरात गोळीबार (Firing) करण्यात आला. टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिडकोत रविवारी मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास दोन टोळ्यांमध्ये वाद झाला. हा वाद नंतर इतका वाढला की, एकाने गावठी पिस्तुलमधून गोळीबार केला. तर काहींनी तलवार घेऊन दहशत निर्माण केली. यात गोळीचा नेम चुकल्याने एकजण वाचला. मात्र या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
निवडणुकीच्या तोंडावरच नाशिकमध्ये गुन्हेगारीत वाढ
मोटार सायकलवरून आलेल्या टोळक्याने गोळीबार केल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी (Nashik Police) सहा जणांना अटक केली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) समोर आले आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) काळात गुन्हेगारी डोकंवर काढत असल्याने निवडणूक शांततेत पार पाडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. तर गुंडांना पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
नाशिकमधून पाच लाखांचा गुटखा जप्त
जुन्या नाशिकमधील बुधवार पेठेतून पावणे दोन लाखांचा तर म्हसरूळ हद्दीतून सुमारे तीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी आयुक्तालय हद्दीतील अवैध धंद्यांविरोधात तीव्र मोहीम सुरू केली आहे. अवैधरीत्या सुरू असलेले जुगार अड्डे, देशी दारूचे अड्डे यावर धडक कारवाई केल्यानंतर आता पोलिसांनी आपला मोर्चा प्रतिबंधित गुटख्याकडे वळविला आहे.
शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे अंमलदार रमेश कोळी, जोगेश्वर बोरसे यांना जुने नाशिकमधील बुधवार पेठेत अवैधरीत्या प्रतिबंधित गुटख्याचा साठा करण्यात आल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने बुधवार पेठेतील संशयित विजय मधुकर शिंदे हा चोरीछुप्या प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू विक्री करीत असताना आढळून आला. त्याच्याकडून 1 लाख 71 हजार 338 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. मखमलाबाद परिसरातील संशयित वैभव उर्फ अशोक मोराडे याच्याकडून 2 लाख 99 हजार 650 रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी एकूण 4 लाख 70 हजार 988 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे.