राष्ट्रीय दर्जाच्या पुणे ऑटो एक्स्पोचे आयोजन येत्या १८ ते २१ एप्रिल रोजी सकाळी १० ते रात्री ६ वाजेर्यंत पुण्यातील क्रिएटीसिटी, येरवडा येथे पार पडणार आहे. आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत संयोजक पी. एन. आर. राजन, टेक फोरमचे विलास रबडे, आयडीटीआर चे संजय ससाने, किशोर पिंगळीकर, बलजीत सिंग हे मान्यवर उपस्थित होते. पुणे ऑटो एक्स्पोमध्ये दुसऱ्या महायुद्धात वापरण्यात आलेल्या व्हिंटेज वाहनांचे प्रदर्शन होणार आहे. एक्स्पोमधील प्रदर्शनात कार, इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी, चार्जिंग आणि पायाभूत सुविधा, ऑटो कॉम्पोनंट्स आणि स्पेअर्स, ऑटो इलेक्ट्रिकल्स यांचा समावेश असेल. ऑटोमोटिव्ह चाचणी, सेवा उपकरणे आणि साधने, संशोधन आणि विकास आणि इतर ऑटो ॲक्सेसरीज या ठिकाणी असणार आहेत.
या चार दिवसीय प्रदर्शनामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (CIRT) सोबत महा मेट्रो, MSRTC, इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स (IEEE) यासह इतर खाजगी आणि सार्वजनिक संस्था यांचा सहभाग असेल. एक्स्पोमधील व्हिंटेज आणि क्लासिक पॅव्हेलियनमध्ये पुणे विभागातील काही उत्कृष्ट वाहनांच्या प्रदर्शनाचा समावेश असेल, ज्यांचा वापर जुन्या काळातील प्रसिद्ध व्यक्तींनी केला आहे. ध्वजारोहण समारंभाला या वाहनांचे मालक उपस्थित राहणार आहेत.
विविध प्रकारची वाहने…वाहनोद्योगातील नवनवे तंत्रज्ञान…स्पेअर पार्टस… ॲक्सेसरीजचा समावेश असलेले पुणे ऑटो एक्स्पो हे प्रदर्शनात वाहतूक उद्योगातील विकसित तंत्रज्ञान आणि मेकॅट्रॉनिक्स या विषयांवर भर देण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात प्रवासी वाहने, चारचाकी व दुचाकी वाहने, कन्सेप्ट व्हेईकल, लष्करासाठी आवश्यक उत्पादने पाहता येतील. त्याचबरोबर विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विविध इंजिनीअरिंग कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांनी बनविलेली वाहनेही येथे पाहता येतील. विद्यार्थ्यांसाठी परिसंवाद तसेच कंपनी भेटीचेही आयोजन करण्यात आले आहे, सदरील प्रदर्शन हे पुणेकरांसाठी विनामूल्य पाहता येणार आहे. पुणे पी. एम. पी. एलचे चालक विकास मारुती मांढरे, अरुण मारुती लोखंडे, न्यानेश्वर मारुती, कोकरे, राजेश संपत भावे यांनी सुरक्षित तसेच उल्लेखिनीय सामजिक कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती संयोजक पी. एन. आर. राजन यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.