पुणे – बुधवार पेठेतून सहा वषीय मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना फरासखाना पोलिसांनी स्वारगेट एसटी बसस्थानकातून अटक केली आहे. आरोपींकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नाझमा बिलाल शेख (वय ४३) आणि रेणू दिलीप राठोड (वय ४१, दोघी रा. ढमढेरे बोळ, बुधवार पेठ) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा सहावर्षीय मुलगा चार मार्च रोजी सकाळी खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. परंतु तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी मुलाचा शोध घेतला. परंतु तो न आढळल्याने त्यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या माध्यमातून तपास सुरू केला.
त्यावेळी तपास पथकातील पोलिस कर्मचारी वैभव स्वामी, प्रवीण पासलकर, सुमीत खट्टे, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यात दोन अनोळखी महिला रिक्षातून संशयास्पदरीत्या जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्या रिक्षाच्या क्रमांकावरून रिक्षाचालकाकडे चौकशी केली.
रिक्षातून मुलाला घेऊन जाणाऱ्या महिलांची ओळख पटवली. त्यावेळी त्या दोघीजणी बुधवार पेठेत राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाझमा शेख हिला ताब्यात घेतले. तपासादरम्यान तिने अपहरण केलेला मुलगा दुसऱ्या महिलेच्या ताब्यात असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी स्वारगेट एसटी बसस्थानकाच्या परिसरात पाळत ठेवली होती.
सहा एप्रिल रोजी रेणू राठोड ही महिला एका लहान मुलासह फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तिला अटक करून अल्पवयीन मुलाला त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवले. पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहाय्यक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या पथकाने ही कारवाई केली.