आयआयएम संबळपूरतर्फे नोकरदार व्यावसायिकांसाठी ‘एमबीए इन फिनटेक मॅनेजमेंट’ पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश खुला

संबळपूर/मुंबई, एप्रिल २०२४: आयआयएम संबळपूर या देशातील आघाडीच्या व्यवस्थापन शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या संस्थेने एनएसई अकॅडमीच्या सहकार्याने फिनटेक मॅनेजमेंट क्षेत्रातील एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश खुला केला आहे. आयआयएमने फिनटेकवर लक्ष केंद्रित करणारा एमबीए अभ्यासक्रम पहिल्यांदाच सुरू केला आहे. संस्थेतर्फे ड्युएल डिग्रीचा पर्यायही देण्यात येत असून त्याअंतर्गत अर्जदारांना सॉरबॉन बिझनेस स्कूल, पॅरिसची ‘एमबीए इन इंटरनॅशनल फायनान्स’ पदवीही मिळवता येणार आहे. युपीआयसारख्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांनी भारताला जागतिक स्तरावरील फिनटेक क्षेत्रात आघाडीचे स्थान मिळवून दिले. देशाने पेमेंट्स, डिजिटल कर्ज सुविधा, इन्शुरटेक, वेल्थटेक अशा क्षेत्रांत लक्षणीय प्रगती केली. फिनटेक क्षेत्राची विकास क्षमता लक्षात घेता या बदलते तंत्रज्ञान, नियामक पडताळणी आणि बाजारपेठेतील समीकरणे हाताळण्यासाठी कुशल कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. धोरणात्मक सहकार्याचा मजबूत पाया लाभलेल्या या अभ्यासक्रमात सहभागींना ब्लॉकचेन, एआय आणि क्रिप्टोग्राफी, धोरणात्मक क्षमतांचा विकास व अत्याधुनिक तंत्रज्ञान कौशल्य अशा तांत्रिक बाबींचे खास ज्ञान दिले जाणार आहे.

आयआयएम संबळपूरचे संचालक प्रो, महादेव जैस्वाल म्हणाले, ‘९००० फिनटेक स्टार्ट अप असलेला आपला भारत देश जगातील तिसरे मोठे फिनटेक हब आहे. या क्षेत्राद्वारे २०३० पर्यंत आताच्या व्यवसायाच्या चौपट म्हणजेच ४०० अब्ज डॉलर्स व्यवसायाची निर्मिती होईल असा अंदाज आहे. रोजगार निर्मितीची वाढती संख्या आणि विकसित होत असलेली स्टार्ट अप यंत्रणा यांमुळे रोजगार तसेच व्यवसायाच्या मुबलक संधी उपलब्ध होतील. एमबीए इन फिनटेक मॅनेजमेंट अभ्यासक्रम सुरू करून खास ज्ञान, कौशल्ये आणि अनुभव मिळवून देत सहभागींना उद्योजक किंवा इन्त्राप्रेन्युअर बनण्याची संधी देण्याचे उद्दिष्ट आहे. या १८ महिन्यांच्या अभ्यासक्रमामध्ये काळजीपूर्वक तयार करण्यात आलेले १७ तीन टर्म्सदरम्यान घेतले जाणार आहेत. पर्यायाने शिक्षणाचा हा प्रवास सर्वसमावेशक बनण्यास मदत होईल.’

हे अभ्यासक्रम व्यावसायिक नोकरदारांसाठी खास तयार करण्यात आले असून या सर्वसमावेशक अभ्यासक्रमात १७ खास कोर्सेसचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांचे स्वरूप संमिश्र असल्यामुळे युरोप व आशियाई देशांतील नोकरदारांनाही त्यासाठी अर्ज करता येणार आहे. हा अभ्यासक्रम आयआयएम संबळपूर, मुंबईतील एनएसई अकॅडमी यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला असून ड्युएल डिग्रीसाठी सॉरबोन बिझनेस स्कूल (पॅरिस) सहकार्य मिळणार आहे. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची तारीख २४ मे २०२४ आहे.

आयआयएम संबळपूरचे प्रोग्रॅमचे अध्यक्ष प्रो. दिवाहार नदार म्हणाले, ‘एमबीए इन फिनटेक मॅनेजमेंट अभ्यासक्रमामध्ये संमिश्र शिक्षण दिले जाणार असून आयआयएम संबळपूर येथे प्रत्येक सेमिस्टरदरम्यान बुधवार व शनिवार- रविवारी ऑनलाइन लेक्चर्स घेतली जातील. खास इनक्युबेटर प्रोग्रॅम या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य असून त्यामध्ये फिनटेक स्टार्ट अप्स लाँच करण्यासाठी मेंटरशीप दिली जाते. या अभ्यासक्रमाअंतर्गत फिनटेक क्षेत्राशी प्रातिनिधिक संबंध जपत नेटवर्किंगच्या अमाप संधी व औद्योगिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. चर्चा घडवून आणण्यासाठी आणि फिनटेक क्षेत्रातील विविध भागधारकांना एकत्र आणण्यासाठी आम्ही ५ मे रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथे चर्चेचे आयोजन केले आहे.’