धार्मिक कलह लावणारे सत्तेवर नकोत : डॉ.कुमार सप्तर्षी

पुणे : पुणे सिव्हिल सोसायटी ‘ आयोजित ‘वेध :भारतीय लोकशाहीचा ‘ व्याख्यान सत्राला शनिवारी सायंकाळी चांगला  प्रतिसाद मिळाला.ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांचे प्रमुख भाषण झाले. युवक क्रांती दलाचे संस्थापक  डॉ.कुमार सप्तर्षी अध्यक्ष स्थानी होते.   कोंढव्यातील नागरिक मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
सिटी लॉन्स(कोंढवा) येथे  झालेल्या या व्याख्यान सत्राचे आयोजन अली इनामदार, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त  मिलिंद गायकवाड, अनीस अहमद, युनूस तांबटकर , जांबुवंत मनोहर यांनी केले. २७ एप्रिल रोजी सायंकाळी  हे व्याख्यान सत्र झाले. मिलिंद गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. अनीस अहमद यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. जांबुवंत मनोहर यांनी सूत्र संचालन केले.
माजी आमदार महादेव बाबर,राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,डॉ.प्रवीण सप्तर्षी,उमेश चव्हाण, संजय आल्हाट, दत्ता पाकिरे,सुदर्शन चखाले आदी उपस्थित होते.
अशोक वानखेडे म्हणाले, ‘हिंदू मुस्लिम समुदायामध्ये सातत्याने भांडणे, दंगली घडवून आणण्याचे प्रयत्न केले गेले. या कट कारस्थानांना कोणी बळी पडत नाही, हे देशाचे भाग्य आहे.हिंदू- मुस्लीम संबंधांची वीण घटट् असून ती बिघडविण्याचे संबंध यशस्वी होणार नाहीत.
 ‘संविधान सर्वोच्च आहे आणि तेच सातत्याने पुढे आणले पाहिजे. या निवडणुकीत हुकूमशाही ला बाजूला केलें पाहिजे, अन्यथा संविधान जाईल,मनुस्मृती येईल. गुलामगिरी आणि वर्ण व्यवस्था पुन्हा येवू घातली आहे.नरेंद्र मोदी यांच्या काळात पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा कमी झाली. कॉंग्रेसचा जाहीरनामा इंग्रजीत असल्याने पंतप्रधानांना समजत नसावा, असा टोलाही वानखेडे यांनी लावला.
देशाला रसातळाला नेण्याचे काम मोदी यांच्या कार्यकाळात झाल्याने या निवडणुकीत परिवर्तन करून दाखवावे, असे आवाहन वानखेडे यांनी केले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘देशात जनताच सर्वोच्च आहे. लोकप्रतिनिधी सर्वोच्च नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय शहाणपणाचा निर्णय जनतेने घेतला पाहिजे. संघ परिवाराला नरेंद्र मोदी हवे असले तरी जनतेला नको आहेत. व्यापारी व्यक्ती सत्तेवर आल्यावर प्रजा भिकारी होते.   मोदी यांनी प्रत्येक निर्णयात , परदेश दौऱ्यात अदानींचे भले केले. मग ,हे पंतप्रधान आहेत की सेल्समन ? असा सवाल डॉ. सप्तर्षी यांनी विचारला.
 पुण्यात ज्या पक्षाचा खासदार असतो, त्या पक्षाची सत्ता देशात येते. हे पुणेकरांनी लक्षात घेऊन भाजप विरोधी   मतदान केले पाहिजे. अन्यथा आपले सर्वांचे भवितव्य धोक्यात येईल. माणसाला माणसाशी जोडतो तो धर्म असतो. पण, राजकारणात धर्म आणून भाजपाने वाट लावली आहे. खरा हिंदू धर्म सहिष्णू आहे, सत्याला मानणारा आहे. ही प्रतिमा आपण बिघडू देता कामा नये, असे आवाहन डॉ. सप्तर्षी यांनी केले.