कलर्स हिंदीची नवीन मालिका ‘कृष्णा मोहिनी’ मधून उलगडणार बहीण भावाचे अतूट बंध 

पुणे २७ एप्रिल २०२४: भवसागर पार करत असताना पदोपदी अनिश्चितता आणि अडथळ्यांना सामोरे जाताना माणसाला एखादा चाकोरीचा, सुरक्षित मार्ग स्वीकारवासा वाटणे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत एखादा ‘सारथी’ मिळाला तर चकवा देणाऱ्या समुद्रात बोटीला मार्गदर्शक प्रकाश देणारा दीपस्तंभ दिसल्यासारखे बळ मिळेल. ‘कृष्णा मोहिनी’ मालिकेत कृष्णाचा प्रवास दाखवला आहे. कृष्णा एक आदर्श बहीण आहे, जी आपला भाऊ मोहन याच्यासाठी ‘सारथी’ बनून सगळ्या वादळांना हिंमतीने तोंड देते. साचेबंदपणा मोडून त्या दोघांचे नाते पारंपरिक भूमिकांच्या पलीकडे जाते. ‘कृष्णा बहन का फर्ज ऐसे निभाएगी कि दुनिया में राखी की परिभाषा बदल जाएगी’ या थीमसह ही मालिका बहीण-भावाच्या नात्याचे सार विशद करताना दिसेल. भाऊ आणि बहिणीच्या या लोभस नात्याचे दर्शन घडवण्यासाठी कलर्स घेऊन येत आहे ‘कृष्णा मोहिनी’, जी मालिका द्वारकेच्या सृष्टी सौंदर्याच्या आणि तेथील समुद्रतटाच्या रमणीय पार्श्वभूमीवर बेतलेली आहे. या मालिकेत देवत्तमा साहा कृष्णाच्या भूमिकेत, केतकी कुलकर्णी मोहनच्या भूमिकेत आणि फहमान खान आर्यमानच्या भूमिकेत दिसणार आहेत. सुशांत दास आणि निसपाल सिंह यांच्या बॉयहूड प्रॉडक्शन्स द्वारा निर्मित ‘कृष्णा मोहिनी’ २९ एप्रिल रोजी सुरू होत असून दररोज संध्याकाळी ७: वाजता कलर्स हिंदी वाहिनीवर  ती प्रसारित करण्यात येणार आहे.
व्हायकॉम१८ चे अध्यक्ष, जनरल एन्टरटेन्मेंट श्री. आलोक जैन म्हणाले, “कलर्समध्ये अशा कथा सादर करण्याचा आमचा प्रयत्न असतो, ज्यात प्रेक्षकांच्या भावनांचे प्रतिबिंब असेल. ‘कृष्णा मोहिनी’ एक अशीच गोष्ट आहे, ज्यामध्ये बहीण आणि भावातील अतूट नात्याचे चित्रण आहे. साचेबंदपणा मोडून त्या दोघांचे नाते पारंपरिक भूमिकांच्या पलीकडे जाते. जीवनाच्या प्रवासात आपल्यासोबत एक ‘सारथी’ असण्याचे महत्त्व या मालिकेतून सांगितले आहे. आपल्या भावासाठी मार्गदर्शक दीपस्तंभाची भूमिका बजावणाऱ्या, त्याचा ‘सारथी’ बनलेल्या एका बहिणीची ही गोष्ट आहे. या हृदयस्पर्शी कहाणीच्या माध्यमातून आम्ही मनोरंजनाच्याही पलीकडे जाऊन एका सुंदर भावनेची जोपासना करू इच्छितो.”
कृष्णाची भूमिका साकारण्याबाबत अभिनेत्री देवत्तमा साहा म्हणते, “कृष्णा मोहिनी मालिकेत कृष्णाची व्यक्तिरेखा जिवंत करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य मानते. ज्याप्रमाणे, एक ‘सारथी’ अंधाऱ्या रात्रीत मार्ग काढतो, त्याप्रमाणे कृष्णाची व्यक्तिरेखा तिच्या भावाला मार्गदर्शन करते आणि ती जीवनातील नाना वादळांमध्ये त्याचे संरक्षण करण्यास तत्पर राहते. बिनशर्त आणि अपार प्रेमाचा सार्वत्रिक विषय ‘कृष्णा मोहिनी’ मालिकेस भाऊ-बहिणीतील अतूट नात्याचे प्रतीक बनवतो.”
आर्यमानची भूमिका करत असलेला फहमान खान म्हणतो, “एक सारथी मिळणे म्हणजे अंधाऱ्या रात्री मार्गदर्शक तारा सापडण्यासारखे आहे. अशा सारथ्यांना मानवंदना देणाऱ्या ‘कृष्णा मोहिनी’ मालिकेत काम करताना मी रोमांचित आहे. या मालिकेत मी आर्यमानची भूमिका करत आहे, जो कष्टाळू, निग्रही आणि एक यशस्वी व्यावसायिक आहे. पण त्याच्या यशाच्या मागे एक कहाणी आहे, ज्यामुळे त्याचे आयुष्य घडले आहे. कथानक उलगडत जाईल, तेव्हा कृष्णा आणि आर्यमान समोरासमोर येतील, त्या दोघांच्या आपापल्या जबाबदाऱ्या, ओझी, आकांक्षा यामधून एक वेधक कथा तयार होईल.”
पाहायला विसरू नका , ‘कृष्णा मोहिनी’ २९ एप्रिल  २०२४ रोजी दररोज सायंकाळी७ वाजता फक्त कलर्स वाहिनीवर