‘ब्लु जावा’ वाणाच्या केळीचे उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणार : डॉ. भाग्यश्री पाटील

पुणे, २ एप्रिल २०२४: राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांनी पहिल्याच प्रयत्नात अनोखी चव व रंग असणाऱ्या  ‘ब्लु जावा’ वाणाच्या केळीचे उत्पादन घेण्यात यश मिळवले आहे. भारतात पहिल्यांदाच व्यावसायिक तत्वावर ह्या वाणाचे उत्पादन झाले असून पहिलीच तोडणी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावात  झाली. या वेळेस राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड च्या संस्थापिका डॉ. भाग्यश्री पी पाटील, तसेच फार्म ऑपरेशन मॅनेजर श्री. अमेय डी. पाटील, इशिता डी. मोहिते पाटील, सौ. राजलक्ष्मी डी पाटील व आसपासच्या गावांतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड तर्फे वितरित केलेल्या या वाणाचे पहिलेच उत्पादन सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याचे रहिवासी असलेल्या इंजिनीअर व शेतकरी असलेले अभिजित पाटील यांच्या २ एकरांच्या जागेत घेण्यात आले.  ‘ब्लु जावा’ केळीची लागवड घेऊन इतर शेतकऱ्यांना आदर्श ठरलेले प्रगतशील शेतकरी अभिजित पाटील यांनी आजवर  त्यांनी लाल केळी, ड्रॅगन फ्रुट तसेच सफरचंदाचेदेखील यशस्वी उत्पादन घेतले आहे. अभिजित पाटील यांच्या समवेत आणखीही बऱ्याच शेतकऱ्यांनी या केळीच्या वाणाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे हे विशेष.  हे विक्रमी उत्पादन म्हणजे राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या पुण्यातील कंपनीने लागवडीपासून ते आता फळ तोडणीपर्यंत येणाऱ्या प्रत्येक पायरीवर वेळोवेळी शेतकऱ्यांना अचूक मार्गदर्शन केल्याचा परिणाम आहे.

ब्लु जावा वाणाची केळी ही  आरोग्यसाठी अत्यंत हितकर असून ती स्नायूंसाठी, पचनासाठी, हृदयाच्या आरोग्यासाठी व कॅन्सर पासून बचावासाठी उपयुक्त आहेत; तसेच त्यांच्यातील साखरेच्या कमी प्रमाणामुळे ही  केळी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेऊन वजन कमी करण्यात देखील फायदेशीर आहेत. या केळीचे मूळ आग्नेय आशियात मानले जाते व वॅनिला आईस्क्रीम सारख्या चवीमुळे तीला वॅनिला बनाना असे देखील म्हंटले जाते. आज जगभरात ब्लु जावा केळींना अतिशय मागणी असून मोठ्या शहरांमध्ये महागड्या किमतीला तसेच भारतभरातील फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये ही  केळी मोठ्या प्रमाणावर विकली जातात.

या बाबत आणखी बोलताना राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड च्या संस्थापिका डॉ. भाग्यश्री पाटील म्हणाल्या की, “महाराष्ट्राचे नागरिक तसेच आघाडीची बायोटेक कंपनी जी शेतकऱ्यांचे हित साध्य करण्यासाठी आग्रही आहे आज ‘ब्लु जावा’ केळीची लागवडी पासून ते तोडणी पर्यतच्या प्रक्रिये मध्ये शेवट पर्यत सोबत आहोत. आज महाराष्ट्रातील पहिल्या ‘ब्लु जावा’ केळीच्या तोडणीचा हा क्षण अत्यंत अभिमानाचा आहे. या फळाच्या अनोख्या चवीमुळे व गुणधर्मांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या पिकाचे उत्पादन घेण्याची आम्ही प्रोत्साहन देत असून भारतीय बाजारात यास मोठी मागणी देखील आहे.   आमच्यासोबत या प्रयोगात खांद्याला खांदा लावून कष्ट घेतलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे व शेतकऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करते व आश्वासन देते, की  इथून पुढे देखील मी व माझे सहकारी  राईज एन शाईन बायोटेक तर्फे भरगोस उत्पादन देणारी विविध वाणे आपल्या शेतकरी बांधवाना उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असू.