पुणे : ‘आयो लाल झुलेलाल’च्या जयघोषात भगवान साई झुलेलाल यांची भक्तीभावाने केलेली आरती… झुलेलाल यांच्या मनमोहक प्रतिमेचे पूजन… सिंधी गीतांची बहारदार मैफल… कलात्मक नृत्याविष्कार… चाट-सामोसा-गो ड भाताचा प्रसाद… रुचकर लंगर… डोक्यावर लाल टोपी आणि साई झुलेलाल यांचे अखंड भजन अशा भावभक्तीमय वातावरणात सिंधी संस्कृतीचे दर्शन घडले. या वार्षिक महोत्सवात सहभागी प्रत्येक सिंधी बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
सिंधी समाजाचे नवीन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या १०७४ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सव आयोजिला होता. येरवड्यातील डेक्कन कॉलेजच्या बँक्वेट हॉल व मैदानावर झालेल्या या महोत्सवात सहभागी प्रत्येक सिंधी बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात झाली. संगीत, गायन, भजन आणि महाप्रसादातील विविध पदार्थ यामुळे चेटीचंड महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
मुंबईतील प्रसिद्ध गायक शुभम नाथानी, नागपूरची प्रतिभावान गायिका दृष्टी कुकरेजा, राजस्थानचे उत्कृष्ठ गायक मास्टर हर्षल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आणि जयपूर येथील विनोदवीर भाग्यश्री दर्यानीच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. सिंधी समाजात कपिल शर्मा अशी ओळख असलेल्या मोहित शेवानीने कार्यक्रमाचे संचालन केले. जनरेशन नेक्स्ट डान्स अकँडमीच्या मुलांनी मनमोहक नृत्याविष्कार सादर केले. प्रीतिभोजनाने (महाप्रसाद) महोत्सवाची सांगता झाली. पुणे, पिंपरी-चिंचवड व परिसरातील चार-साडेचार हजार सिंधी बांधव या महोत्सवात सहभागी झाले.
आसवानी प्रोमोटर्स अँड बिल्डर्सचे संस्थापक संचालक श्रीचंद आसवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत बीजे मेडिकल महाविद्यालयातील निवृत्त सहयोगी प्राध्यापक डॉ. लछमनदास फेरवानी यांच्यासह सिंधी समाजातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. तसेच मुकुल माधव फाउंडेशन व एएनपी केअर फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष अशोक वासवानी, संस्थापक सदस्य ईश्वर कृपलानी, माजी अध्यक्ष मनोहर फेरवानी, सुरेश जेठवानी, पीटर दलवानी, दीपक वाधवानी, विजय दासवानी, उपाध्यक्ष पुरुषोत्तम पर्यानी, सचिव सचिन तलरेजा, खजिनदार राजेंद्र फेरवानी, सहखजिनदार निलेश फेरवानी, जनसंपर्क अधिकारी देवेंद्र चावला, सिमरन जेठवानी, विनोद रोहानी आदी उपस्थित होते.
अशोक वासवानी म्हणाले, “सिंधी संस्कृती विषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासह सिंधी परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सिंधू सेवा दल गेली ३७ वर्ष कार्यरत आहे. चेटीचंड महोत्सवानिमित्त सर्व समाज एकत्र येतो. भगवान साई झुलेलाल यांचा उत्सव साजरा करतो. हा आनंदाचा क्षण अनुभवण्यासाठी आम्हीही दरवर्षी यामध्ये सहभागी होतो.”
या मैदानावर पहिल्यांदाच होत असलेल्या चेटीचंड महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सुरेश जेठवानी यांनी प्रास्ताविकात नमूद केले. सचिन तलरेजा यांनी आभार मानले.