पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने सोमवार, १८ मार्च २०२४ रोजी आयोजित संविधान अभ्यास वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला. या अभ्यास वर्गामध्ये ‘लोकशाही,मतदान आणि मतदार’ या विषयावर राज्यशास्त्राचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे यांनी मार्गदर्शन केले.
हा अभ्यासवर्ग सोमवार, १८ मार्च २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता एस.एम.जोशी फाउंडेशन सभागृह,पुणे येथे झाला. युवक क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष संदीप बर्वे आणि पुणे शहर उपाध्यक्ष नीलम पंडित यांनी स्वागत केले.महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित हा आठवा संविधान अभ्यास वर्ग होता.
युक्रांदच्या पुणे शहर उपाध्यक्ष नीलम पंडित यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.
नितीन चव्हाण, असलम बागवान, एकनाथ पाठक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रा.अविनाश कोल्हे म्हणाले, ‘जिथे लोकशाही नाही तिथे लोकशाही यावी यासाठी लढे होत आहेत, जिथे लोकशाही आहे, तिथे अधिक लोकशाही मिळावी, यासाठी लढे होत आहेत.
विविधता हेच भारताचे शक्तीस्थान आहे. त्याचाच अभ्यास पाश्चात्य राष्ट्र करीत आहे. ‘मल्टीकल्चरिझम ‘ च्या आधारेच जग पुढे जाईल.भारताप्रमाणे सातत्याने निवडणुका होणारे देश दुर्मीळ आहेत ‘.
निवडणूक आयोग, कॅग, वित्त आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग सारख्या संस्था स्वायत्त आहेत, कारण त्यांना घटनात्मक दर्जा आहे.शेजारील देशांकडे पाहिले की आपल्याला भारतातील लोकशाहीचे महत्व पटते. भारतात १९२०, २०३७ पासून निवडणूक संस्कृती विकसित झाली आहे.
निवडणूक लढविण्यासाठी केवळ वय ही अट आहे. शिक्षण, संपत्ती, लिंग कसलीच इतर अट नाही. निवडणूक लढविण्यासाठी केवळ वय ही अट आहे. शिक्षण, संपत्ती, लिंग कसलीच इतर अट नाही. मात्र, त्रूटींचा उल्लेख करायचा झाल्यास सार्वत्रिक निवडणुकीत ५० टक्के मते कोणत्याही पक्षाला मिळालेली नाहीत. एकाच पक्षाचे वर्चस्व राहणे, शॅडो कॅबिनेट नसणे, जबाबदार विरोधी पक्ष नसणे, सशक्त पर्याय नसणे, याही त्रूटींकडे पाहिले पाहिजे, निवडणूक घेणे खर्चिक आहे, असेही प्रा. कोल्हे यांनी सांगितले.
खरा लोकप्रतिनिधी होण्यासाठी एकूण मतदानाच्या किमान ५० टक्के मतदान मिळणे आवश्यक आहे. नोटा मतदानाला अधिक सक्षम केले पाहिजे. लोकप्रतिनिधींचा घोडेबाजार थांबला पाहिजे.मतदान सक्तीचे करण्यावरही अनेक तज्ज्ञ मते मांडत आहेत, कोठूनही मतदान करता येण्याबाबत मते मांडली जात आहेत,असेही प्रा. कोल्हे यांनी सांगितले.
संदीप बर्वे म्हणाले, ‘ एकाच संविधानाच्या आधारे ७५ वर्ष चालणारा भारत हा एकमेव देश आहे.आताची लोकसभा निवडणूक ही संविधानासाठी महत्वाची आहे. हुकूमशाहीच्या पराभवासाठी आम्ही १० लाख मतदारांपर्यंत पोहोचणार आहोत. मतदानातून परिवर्तन घडविण्याचा उद्देश आपल्यासमोर आहे.संविधान संवाद उपक्रम ७५ हजार नागरिकांपर्यंत पोहोचले आहे, अशी माहिती नीलम पंडित यांनी दिली.