खडकवासला जलाशय रक्षण अभियानाची यशस्वी सांगता !

पुणे – हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने संयुक्तरित्या राबवलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहीमेची यशस्वी सांगता 30 मार्च या दिवशी करण्यात आली. 22 व्या वर्षी सर्वांच्या प्रयत्नामुळे मोहीम यशस्वी झाल्यावर उपस्थित संघटनांनी वर्षभर अश्याच प्रकारे पर्यावरण आणि संस्कृती रक्षणाचे उपक्रम ठिकठिकाणी राबवण्याचा निर्धार केला. यावेळी जाधवर इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग विभागातील विद्यार्थी आणि शिक्षक मिळून 50 जणांनी मोहिमेत सहभागी नोंदवला. त्यांनी मानवी साखळी करत 2 तास जनतेचे प्रबोधन केले. या मोहिमेत पुण्यातील विविध भागांतील धर्मप्रेमी तसेच जाधवर इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग विभागातील विद्यार्थी आणि शिक्षक असे मिळून एकूण 200 हून अधिकजण प्रत्यक्ष सहभागी झाले. येणाऱ्या जाणाऱ्या अनेक मान्यवरांनी मोहिमेचे कौतुक केले.
संपूर्ण पुणे जिल्ह्यातील 26 धरणांमध्ये मिळून सध्या 56.31 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून सध्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याचे हे प्रमाण एकूण साठ्याच्या तुलनेत केवळ 28.39 टक्के इतके कमी आहे. असे असतांना खडकवासला धरणातील जलाशयाचे रक्षण करण्याचे महत्वाचे कार्य आज ईश्वरी कृपेने पूर्ण झाले याची आम्हाला कृतज्ञता आणि समाधान वाटते. अश्या भावना येथे रंगपंचमी निमित्त खडकवासला जलाशय रक्षण अभियानात सहभागी समविचारी संघटना आणि समाजातील सहभागी नागरिक यांनी व्यक्त केल्या.
सकाळी 9 वाजल्यापासून हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखेचे कार्यकर्ते हे प्रबोधन करत होते. प्रबोधनानंतर या ठिकाणी येणारे नागरिकही या मोहिमेत सहभागी होत होते. अश्या प्रकारे होत असलेले प्रबोधन त्यातून मिळणारा अभूतपूर्व सहभाग आणि संपूर्ण सकारात्मक प्रतिसाद यामुळेच या वर्षीही मोहीम 100% यशस्वी झाली. मोहीम यशस्वी होण्यासाठी पाटबंधारे खाते, पोलीस प्रशासन, हितचिंतक यांनी मोलाचे सहकार्य केले. हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी सर्व सहभागी आणि सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे समितीच्या वतीने आभार व्यक्त केले.