पुणे : “सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून दिव्यांगासाठी लायन्स क्लबकडून सुरु असलेले कार्य कौतुकास्पद आहे. दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनही प्रयत्नशील आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहचवल्या पाहिजेत. त्यांच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले. दिव्यांगांसाठी एकाच छताखाली सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी लायन्स क्लबने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करीत शासकीय स्तरावर लागणारी सर्वोतपरी मदत करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
लायन्स क्लब इंटरनॅशनल ३२३४ डी-२ च्या वतीने आयोजित ‘हाक दिव्यांगांची, साथ लायन्सची’ उपक्रमाअंतर्गत २६ दिव्यांगांना व्हीलचेअरचे वाटप प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. एरंडवणे येथील सेवासदन शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात माजी प्रांतपाल रमेश शहा, दीपक शहा, ‘सेवासदन’चे सरचिटणीस चिंतामणी पटवर्धन, दिव्यांग विभाग प्रमुख सीमा दाबके यांच्यासह लायन्स क्लबचे सभासद, दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन नहार यांच्याकडून एक व्हीलचेअर भेट देण्यात आली.
दिव्यांगांसाठी लायन्स क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असतो. अनेकांचे या उपक्रमात सहकार्य मिळत आहे. दिव्यांगांना दैनंदिन जीवन जगताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे कार्य समाधान देऊन जाते, अशी कृतज्ञ भावना रमेश शहा यांनी व्यक्त केली.
दीपक शहा म्हणाले, दिव्यांगांना सर्व सोयींनी युक्त असे ‘लायन्स मेडिकल भवन’ उभारण्याचा आमचा मानस आहे. या मेडिकल भवनमध्ये दिव्यांगांसाठी सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा, शासकीय योजना, प्रशिक्षण केंद्र, कार्यशाळा उपलब्ध होणार असून, यासाठी लागणारी जागा मेधाताईंनी उपलब्ध करून द्यावी.
रमेश शहा यांच्या संकल्पनेतून ‘हाक दिव्यांगांची, साथ लायन्सची’ या उपक्रमाला सुरुवात झाली. आज या उपक्रमाअंतर्गत २५ दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेअर देण्यात आल्याचे सीमा दाबके म्हणाल्या. सूत्रसंचालन मेघना जोशी यांनी केले. आभार ऋजुता पितळे यांनी मानले.