सनातनी आणि वारकरी  यातील एकच विचार स्वीकारावा लागेल: ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बंडगर

पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी,युवक क्रांती दल आणि भारत जोडो अभियानाच्या वतीने आयोजित  वारकरी संप्रदाय परिचय अभ्यासवर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला.सोमवार,दि.२५ मार्च रोजी  दुपारी ४ वाजता एस.एम.जोशी सोशालिस्ट फाउंडेशन येथे हा अभ्यासवर्ग झाला.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी मार्गदर्शन केले.संयोजन समितीच्या वतीने विवेक काशीकर,संदीप बर्वे आणि नीलम पंडित यांनी स्वागत केले.शालिनी पंडित,मनीष देशपांडे, सुदर्शन चखाले, नितीन चव्हाण , श्रीरंग गायकवाड,तेजस भालेराव उपस्थित होते.नीलम पंडित यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.
ह. भ. प. बंडगर म्हणाले, ‘ भारतात चार्वाक, बुद्ध यांच्या परिवर्तनवादी परंपरांनंतर नाथ पंथ, लिंगायत आणि वारकरी संप्रदायाचा विचार पुढे आला. त्यातून स्त्री आणि शुद्र मानल्या गेलेल्यांचा कैवार, वेदप्रामाण्यवादाचा विरोध,लोकभाषांतून प्रबोधन, योग विद्येचा पुरस्कार केला गेला.
वेद कितीही ज्ञान संपन्न असला तरी तो कंजुष आहे, असे ज्ञानेश्र्वर महाराजांनी म्हटले आहे. कारण वेदात शूद्र, अती शूद्र आणि महीलाना अधिकार नाहित.वारकरी संतांनी जाती भेदाविरुद्ध काम केले.वारकरी संप्रदायातील काल्याचा विधी हा जातीभेद मिटविणारा आहे.
सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचे मूळ कबीर यांच्या विचारात आहे.
वारकरी संप्रदाय हा सर्वांना सामावून घेणारा सर्व समावेशक संप्रदाय आहे.
आता वर्णवर्चस्ववादी मंडळी सनातनी विचार मांडत आहेत.बुद्धी भेद करीत आहेत.हा तथाकथित सनातन विचार आणि वारकरी विचार यातील एकच विचार स्वीकारावा लागेल, असेही बंडगर महाराज यांनी सांगितले.