गुन्हेगाराने पोलिसांवर सोडले कुत्रे

पुणे : दहशत माजविल्याप्रकरणी रिहे (ता. मुळशी) येथील सराईत गुन्हेगाराला पौड पोलिसांनी अटक केली. मंगेश नामदेव पालवे (वय ३२, रा. रिहे) असे या गुंडाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पालवे याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई केली होती. त्यात तो येरवडा कारागृहात होता. न्यायालयाने त्याला नुकताच जामीन मंजूर केला होता. त्याने शनिवारी (ता. २३) रिहे गावात एकाला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडील अकरा हजार रुपयांची रोख रक्कम लुटली होती. त्याची माहिती मिळताच रविवारी पौड पोलिसांचे पथक रिहे गावात गेले होते.

Dog

मात्र, पोलिसांना पाहून पालवे याने त्याच्याकडील एक हिंस्र जातीचे पाळीव कुत्रे पोलिसांच्या अंगावर सोडले. पोलिसांच्या अंगावर तो कुत्रा धावून गेल्याने पोलिसांना त्याला लगेचच ताब्यात घेता आले नाही. त्यावेळी पालवे घरात गेला आणि त्याने खिडकीतील काचेने स्वतःवर वार केले. तसेच, बिअरची बाटली डोक्यात फोडून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी श्वानाबाबत वनविभागाला माहिती देऊन पालवे याला ताब्यात घेतले.

#BIG NEWS Ajit Pawar : अजित पवार ४ महिन्यांत तुरुंगात जाणार?

न्यायालयाने पुढील तपासासाठी पालवे याला बुधवारपर्यंत (ता. २७) पोलिस कोठडी सुनावली आहे. पौड पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुधीर कदम पुढील तपास करीत आहेत.