मराठी उद्योजक ग्लोबल होताहेत ही आनंदाची बाब : उद्योगमंत्री उदय सामंत

मराठी उद्योजक घडवण्याचे सॅटर्डे क्लबचा उपक्रम प्रशंसेस पात्र : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मराठी उद्योजक गेल्या काही वर्षांमध्ये जगभरात आपल्या कार्यकर्तृत्वाचा डंका वाजवत आहेत. डाओससारख्या ठिकाणी जाऊन मराठी उद्योजक आपले औद्योगिक करारमदार करीत आहेत. मराठी उद्योजक आता ग्लोबल होत असून, ही अतिशय आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने उद्योग दिंडी उपक्रम आयोजित करण्यात आला. ही उद्योग दिंडी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी येथून निघाली असून, ती पुढे पंढरपूरला पोहोचणार आहे. यानिमित्ताने पुण्यातील बावधनमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण मराठमोळ्या वातावरणात मराठी उद्योजकांच्या मांदियाळीचे दृश्य फारच मनमोहक होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक महादेवराव भिडे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या उदघाटनाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या वेळी सॅटर्डे क्लबचे चेअरमन अशोक दुगाडे, सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस, डेप्युटी सेक्रेटरी जनरल केदार साखरे, कौन्सिल आॅफ अॅडव्हायजर संतोष पाटील, प्रदीप ताम्हाणे, रवींद्र प्रभुदेसाई, सुरेश हावरे, विजय परांजपे, रिजन हेड (पुणे वेस्ट) विभावरी ब्राह्मणकर, रिजन हेड पुणे सेंट्रल रोहित केसकर यांच्यासह सॅटर्डे क्लबचे पदाधिकारी तसेच मराठी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठी उद्योजक-व्यावसायिकांना प्रगतीसाठी मदत करणे सॅटर्डे क्लबचे कार्य खरंच खूप अभिनंदनीय आहे, कारण असं म्हटलं जातं की, मराठी माणसाला व्यवसायापेक्षा नोकरी अधिक प्रिय असते. परंतु तुम्ही हा समज खोडून काढला आहे. नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारा मराठी उद्योजक घडवण्याचे प्रयत्न हे खरंच प्रशंसेस पात्र आहेत. मराठी उद्योजकांना घडवण्याच्या तुमच्या या प्रयत्नांना राज्य सरकार नेहमीच योग्य ते सहकार्य करेल, असे मी या ठिकाणी मंत्री म्हणून ठामपणे सांगतो.

याप्रसंगी बोलताना उदय सामंत म्हणाले की, गेल्या दोन-अडीच वर्षांत आम्ही राज्यात ३२ हजार नवे उद्योजक तयार केले. यातून मोठ्या प्रमाणात राज्यात एकीकडे गुंतवणूक वाढली तर दुसरीकडे रोजगारवृद्धी देखील झाली. येत्या काळात राज्यात १५ लाख कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक येणार आहे. या गुंतवणुकीत मराठी उद्योजकांनी सहभागासाठी तयार रहावे. महाराष्ट्रातून जे मराठी उद्योगपती दुसऱ्या राज्यांमध्ये आपला उद्योग नेणार होते, ते आम्ही थांबवले आणि त्यांना राज्यातच विस्तार करण्याची विनंती केली. त्यामुळे राज्यात मोठी गुंतवणूक वाढली आहे. उद्योगांसाठी राज्य शासन रेड कार्पेट आंथरून स्वागत करीत आहे. सरकार आणि उद्योगांनी हातात हात घालून काम केल्यास राज्याचा जोरदार विकास होईल.

मी उद्योगमंत्री असल्यापासून गेल्या अडिच वर्षांत मी उद्योगांना ९ हजार कोटी रुपयांचा इन्सेंटिव्ह वाटला आहे, तसेच आणखी १४ हजार कोटींचे वाटप उद्योगांना करणार असल्याची माहिती सामंत यांनी या वेळी दिली.

यानंतर कार्यक्रमात एक पॅनेल डिस्कशन आयोजित करण्यात आले. यामध्ये मालपाणीज् बेकलाईट चे व्यवस्थापकीय संचालक सचिन मालपाणी, पितांबरीचे एमडी रवींद्र प्रभुदेसाई, मॅरिगोल्ड बॅन्क्वेट्सचे संचालक शंतनू देशपांडे, तसेच मुंबईच्या सुप्रसिद्ध उद्योजिका पाटील काकी उपस्थित होत्या. सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ व केतन गाडगीळ यांनी पॅनेलमधील सदस्यांशी संवाद साधला.

अपयशानंतरही जिद्द ठेवल्यास यशस्वी उद्योजक घडतात : सचिन मालपाणी

यावेळी बोलताना सचिन मालपाणी म्हणाले की, आज जरी मी बेकरी उद्योगात एक यशस्वी उद्योजक बनलो असलो, तरी माझा हा प्रवास अत्यंत खडतर असा होता. आमच्या घरातच बेकरी प्राॅडक्ट्सच खाण्याची बंदी होती. त्याला अस्वच्छ बेकरीत बनणारे पदार्थ तसेच घरातील शाकाहारी वातावरण हे कारणीभूत होते. विविध व्यवसायात अपयश आल्यानंतर मी अत्यंत जिद्दीने व्यवसायात कार्यरत राहिलो आणि हायजीनिक आणि शुद्ध शाकाहारी बेकरी प्राॅडक्ट्स बनवण्याचा निश्चय पक्का केला. आज तीच आमची खरी यूएसपी बनली आहे. सुरवातीला या व्यवसायात खूप संघर्ष करावा लागला. सुरवातीला आम्ही हाताने क्रिमरोल तयार करायचो, नंतर परदेशी जाऊन आधुनिक मशीन्स आणल्या. त्यामुळे आज आमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे

व्यवसाय करताना फायनान्सच्या अनंत अडचणी आल्या. परंतु श्रीमंत आणि दिलदार मित्रांमुळे आयुष्यात नेहमी मी यशाकडेच मार्गक्रमण करीत राहिलो. जिद्द कायम ठेवत नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आणि त्यातून यशाचा मार्ग गवसला. आजच्या उद्योजकांनीही आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरल्यास त्यांना नक्कीच यश मिळू शकते, हे मी नक्की सांगेन, असेही सचिन मालपाणी म्हणाले.