Ladki Bahin Yojana : वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आतमध्ये असलेल्या कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी या हेतून महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. जुलै महिन्यात घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सुमारे दोन कोटी महिलांना आत्तापर्यंत दरमहा 1500 रुपये देण्यात आले.
जुलै ते डिसेंबर असे 9 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले असून आता या योजनेबाबत आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे.राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीच यासंदर्भात माहिती दिली आहे.
जानेवारी 2025 महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 24 जानेवारी 2025 पर्यंत 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून, 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे,असे ट्विट अदिती तटकरे यांनी केलं आहे. त्यामुळे आता सातव्या महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी 1 कोटी 10 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा निधि जमा झाल्याचे त्यांनी नमूद केलं. उद्यापर्यंत (26 जानेवारी) सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, असेही त्यांनी नमूद केलं
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जुलै ते डिसेंबर असे प्रत्येक महिन्याचे 1500 मिळून एकूण 9 हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यभराती सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजेनचा लाभ घेतला आहे. तर जानेवारीचा हप्ताही आता जमा होत असून सात महिन्यांचे मिळून एकूण 10 हजार 500 रुपये पात्र महिलांना मिळतील.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हफ्ता 25 डिसेंबरला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. तर जानेवारी महीना अर्धा उलटून गेला तरीही पैसे मिळाले नव्हते,त्यामुळे हे पैसे कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यासंदर्भात अदिती तटकरे यांनी गेल्या आठवड्यात माहिती दिली होती. या योजनेचा जानेवारीचा हप्ता, ते पैसे 26 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये लाभार्थी महिलांना लाभ मिळण्यास सुरु होईल, असे त्यांनी नमूद केले होते. त्याप्रमाणे आता कालपासून (24 जानेवारी) पात्र महिलांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे.