पुणे : गेली काही वर्षे वास्तव्य सिंगापूर येथे; पण भारतीय शास्त्रीय नृत्य कलेच्या ओढीने कथक या कला प्रकारात विशारद झालेल्या श्रेया (Shreya) चतुर्वेदी हिने आज रंगमंच प्रवेशाच्या सादरीकरणातून गुरूंप्रती आदर व्यक्त केला. विविध ताल-मात्रांच्या रचनांवर बहारदार नृत्यप्रस्तुती करीत रसिकांनाही तिने आपल्या सादरीकरणातून मोहित केले. श्रेयाने ही किमया साधली आहे अवघ्या सोळाव्या वर्षी.
Christmas Day 2023 : शाळेत मुलांना ‘सांताक्लॉज’ बनवू नका अन्यथा कारवाई, कुणी काढले फर्मान?
निगडी, प्राधिकरणातील ग. दि. माडगुळकर ऑडिटोरियममध्ये आज (दि. 21) श्रेया चतुर्वेदी हिचा रंगमंच प्रवेशाचा अनोखा सोहळा आयोजित करण्यात आला होता. पद्मभूषण पंडित विश्वमोहन भट, पद्मश्री गिरीश प्रभुणे, कथक नृत्यगुरू पंडित नंदकिशोर कपोते, कथक नृत्यगुरू जफर मुल्ला खाँ, पंडित राजेंद्र गंगाणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय कार्यवाह मुकुंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रेया हिला शंकर कुचरेकर (तबला), ज्ञानेश भोईर (संवादिनी, गायन), नितीश पुरोहित (सरोद), श्रेया पटणी (पढंत), नृत्यगुरू अफसर मुल्ला खाँ (पखवाज) यांनी साथसंगत केली.
श्रेया हिने आपल्या सादरीकरणाची सुरुवात केदार रागातील पंचाक्षर शिवस्तुतीने केली. त्यानंतर वीररस दर्शविणाऱ्या ताल धमारमधील उठान, तोडा, परण, आमद, चक्रदरपरण दमदारपणे सादर करून कलेत पारंगत असल्याची झलक दाखविली. जफर मुल्ला खाँ यांच्या राग मल्हारमधील ‘गरजत बरसत मन भावत’ या बंदिशीवर श्रेया हिने नृत्याद्वारे अभिनयाचे मोहक दर्शन घडविले.
कथक नृत्य शैलीतील बनारस, लखनौ आणि जयपूर घराण्यांची वैशिष्ट्य दर्शविणाऱ्या तीन तालातील द्रुत लयीतील तोडा, परण, ताल की तिहाई, गत निकास, चक्कर का तोडा यांच्या बहारदार सादरीकरणातून श्रेयाने रसिकांना अचंबित केले. या नंतर ‘छुम छननन बाजत पैंजनियाँ’ ही बंदिश चतुरंगाद्वारे सादर केली. सादरीकरणाची सांगता श्रेया हिने भैरवीत गुरू नमन करून केली. तसेच तबल्यावरील बोलांसह नृत्य जुगलबंदी सादर करून कथक नृत्यातील आपले प्राविण्य दर्शविले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर गुरूंनी श्रेया हिच्या सादरीकरणाचे कौतुक केले आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नृत्यगुरू मनिषा साठे, निवेदिता जोशी, बुद्धिबळपटू प्रविण ठिपसे यांनी दृकश्राव्य माध्यमातून श्रेयाला शुभेच्छा दिल्या.
Viral Video : लग्नात पनीरवरून राडा, एकमेकांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या, भर मंडपात…
पंडित विश्वमोहन भट म्हणाले, नृत्य या कलाप्रकारात गायन, वादन या कलांचाही समावेश होतो. श्रेयाने लहान वयात भारतीय अभिजात शास्त्रीय नृत्य परंपरेत प्राविण्य मिळविले असून तिने परिपक्व व मोहक करणाऱ्या नृत्याने सर्वांना अचंबित केले आहे. भारतात वास्तव्यास नसतानाही श्रेया कथक या भारतीय नृत्य प्रकारात समर्पण वृत्तीने प्रशिक्षण घेत आहे आणि तिला पालकांचेही प्रोत्साहन लाभत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.
अजय चतुर्वेदी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, कथक नृत्याच्या प्रशिक्षणात अभावानेच सादर होणाऱ्या रंगमंच प्रवेशाचा सोहळा श्रेयाच्या कथक कलेविषयी समर्पण भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी अरंगेत्रम्च्या धर्तीवर गायक, वादकांच्या रंगमंचीय सहभागातून आयोजित करण्यात आला.
मान्यवरांचे स्वागत शिवलाल चतुर्वेदी, अजय चतुर्वेदी, पूनम चतुर्वेदी, विनोद बन्सल, सचिन काळभोर यांनी केले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी केले.