शिवाजीनगर मतदारसंघातून झाली सुमारे ७ हजार नवमतदारांची नोंद…….

प्रतिनिधी, पुणे – विधानसभेच्या शिवाजीनगर मतदारसंघातून सुमारे ७ हजार नवमतदारांची नोंद झाली आहे. माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण आणि सहकाऱ्यांच्या प्रयत्नांतून हे शक्य झाले आहे. मतदार नोंदणीसाठी निम्हण यांच्यामार्फत ४ ते ९ जुलै दरम्यान यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती.

विधानसभेच्या शिवाजीनगर मतदारसंघातील या मतदार नोंदणी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. मतदार म्हणून नाव नोंदवताना नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी काळजी घेण्यात आली. मतदारसंघात तब्बल ४० ठिकाणी नावनोंदणीसाठी व्यवस्था करण्यात आली होती.

या संदर्भात सनी निम्हण यांनी सांगितले, “लोकसभा निवडणूक मतदानादरम्यान मतदार यादीतून नाव वगळल्याच्या अनेक तक्रारी होत्या. विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ही मोहीम राबवली. नवमतदारांमध्ये मतदानाचा चांगलाच उत्साह असल्याचे या मोहिमेत जाणवले. पहिल्या मतदानाबाबत तरुणाईला चांगलीच उत्सुकता आहे. त्यामुळेच त्यांचे नाव मतदार यादीत नक्की यावे, यादृष्टीने नियोजन करून आम्ही ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला.”

नावात दुरुस्ती, पत्त्यात बदल अशा विविध गोष्टींसाठीही या मोहिमेंतर्गत मतदारांना साह्य करण्यात आले. या मतदार नोंदणी मोहिमेस जागृत पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशाच प्रकारच्या मोहिमा राज्यभरात सर्वच मतदारसंघांमध्ये झाल्यास मतदार नोंदणीमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकेल.