पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित ‘विष्णवे अर्पणम’ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमात कुचिपुडी नृत्यातून पारंपरिक रचना सादर केल्या गेल्या.हे बहारदार एकल कुचिपुडी नृत्य नाशिकच्या वैदेही कुलकर्णी यांनी सादर केले.या कार्यक्रमाचे निवेदन डॉ.शोभा सुपेकर यांनी केले.
आज आषाढ प्रतिपदा असल्याने व याच महिन्यात गुरू पौर्णिमा असल्याने, वैदेही यांनी आजच्या कार्यक्रमात त्यांच्या तिन्ही गुरू स्वर्गीय गुरू पद्मभूषण डॉ. वेमपत्ती चिन्ना सत्यम, गुरू श्रीमती मंजू भार्गवी आणि स्वर्गीय गुरू वम्पत्ती रवी शंकर या तिघांनी दिग्दर्शित केलेल्या भगवान विष्णूवरील वेग वेगळ्या अमूल्य रचना प्रस्तुत केल्या. या प्रस्तुती मध्ये सत्यभामा प्रवेश दरवू, मंडूक शब्दम, रामदास कीर्तन, कृष्णलीला तरांगिनी मधून एक तरांगम, जावली आणि तिल्लाना या प्रकारांचा समावेश होता. गणेश श्लोक, प्रार्थनेने नृत्याची सुरुवात झाली.
हा कार्यक्रम शनीवार,दि.६ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.रसिकांना तो विनामूल्य खुला होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २१६ वा कार्यक्रम होता,अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविकात दिली .