पुणे : उन्हाचा वाढता चटका लक्षात घेता पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स आणि वंचित विकास यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व प्राणी-पक्ष्यांसाठी दाणा-पाणी उपक्रम राबविण्यात आला. ‘वाढता उन्हाळा, पक्षांना सांभाळा’ या अभिनव उपक्रमातून ‘प्राणी वाचवा, पक्षी जगवा’ हा विचार पोहोचवण्यात आला.आरोग्य शिबिरात ५०० मुलामुलींची तपासणी करण्यात आली.
शिबिरात वजन, उंची, रक्तदाब, कान, नाक, घसा, दात, डोळे, मुलींच्या पाळी समस्या, वाढत्या वयातील त्वचेचे प्रश्न, पोटाच्या तक्रारी आदींची तपासणी व डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन मुलांना मिळाले. भारती हॉस्पिटलच्या आयुर्वेद विभागाचे डॉ. शीतल पाटील व डॉ. गजानन पाटील यांच्यांसह डॉ. शुभम विसपुते, डॉ. रोहित यादव, डॉ. प्रतिक उगले, डॉ. नितीश गुप्ता, स्वयंसेवक प्रसाद गोंदकर यांनी आरोग्यसेवा दिली. तसेच यावेळी डॉ. पाटील यांनी वयाच्या चाळीशीनंतर जाणवणारी मेनोपॉजची लक्षणे, शारीरिक व मानसिक बदल, उपाय, आहार, व्यायाम यावर मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार गायकवाड, वंचित विकासच्या मीना कुर्लेकर व सुनिता जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे नियोजन ‘पीव्हीजी’च्या प्रा. उर्मिला पाटील, विवेक झेंडे व वंचित विकासच्या तेजस्विनी थिटे यांनी केले.
डॉ. संजयकुमार गायकवाड म्हणाले, “आगामी काळात वंचित विकासच्या सहकार्याने महाविद्यालयात पर्यावरण, शिक्षण, महिला सक्षमीकरण, स्त्री-पुरुष समानता, मुलांचे समुपदेशन, कार्यशाळा व सत्र आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. युवा पिढीला समाजाप्रती भान असावे व समाजासाठी त्यांनी योगदान द्यावे, त्याचा अभ्यास व अनुभव त्यांना मिळावा यासाठी हे उपक्रम उपयुक्त ठरतील.”
तेजस्विनी थिटे म्हणाल्या, “या उपक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरण व त्यातील प्रत्येक जीवाचे महत्व समजावून सांगण्यात आले. वाढता उन्हाळा लक्षात घेवून आपल्या परिसरातील तहानलेल्या या चिमुकल्या जीवांसाठी दाणा-पाणी ठेवण्यासाठी १०० मातीची भांडी वाटप करण्यात आले. महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.”