फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनकडून सिम्बायोसिस रुग्णालयातील प्रसूती विभाग अद्ययावत

पुणे: फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने लवळे येथील सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्रातील प्रसूती विभाग व शल्यक्रियागार (ऑपरेशन थिएटर) अद्ययावत करण्यात आले. स्वर्गीय मोहिनी प्रल्हाद छाब्रिया यांच्या स्मरणात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची देणगी सुपूर्त करण्यात आली.

फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे संस्थापक स्वर्गीय प्रल्हाद छाब्रिया यांच्या जयंतीदिनी सिम्बायोसिस रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत करण्यात आला होता. त्याचाच पुढील भाग म्हणून प्रसूती विभाग (लेबर वॉर्ड) व ऑपरेशन थिएटरमध्ये आरोग्य सुविधा सक्षम करण्यात आल्या आहेत. या आरोग्यसुविधेमुळे अकाली, तसेच गुंतागुंतीच्या वैद्यकीय परिस्थितीत जन्मलेल्या बालकांवर उपचार होणे अधिक सुलभ होणार आहे. त्यातून त्यांचे संगोपन योग्यरीत्या होईल. मुळशीच्या ग्रामीण भागातील रुग्णांना आता या स्वरूपाच्या उपचारांसाठी शहरात यावे लागणार नाही.

या सुविधेचे उद्घाटन सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ. राजीव येरवडेकर व होप फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या अध्यक्षा अरुणा कटारा यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रकाश प्रल्हाद छाब्रिया, मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे माजी व्यवस्थापकीय संचालक अनिल वाभी, मुकुल माधव फाउंडेशनचे समन्वयक सचिन कुलकर्णी आणि जितेंद्र जाधव यांच्यासह सिम्बायोसिस रुग्णालय, मुकुल माधव फाउंडेशनमधील कर्मचारी उपस्थित होते.

प्रकाश छाब्रिया यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशनने घेतलेला पुढाकार समाजोपयोगी असल्याचे नमूद केले. डॉ. राजीव येरवडेकर यांनी छाब्रिया आणि मजूमदार कुटुंबाच्या स्नेहाबद्दल भावना व्यक्त करत गोरगरीब रुग्णांवर उपचाराकरिता हा पुढाकार मोलाचा ठरणार असल्याचे सांगितले. अरुणा कटारा यांनी सामान्यांना आधार देण्याचा छाब्रिया दाम्पत्याचा वारसा योग्य पद्धतीने पुढे घेऊन जात असल्याबद्दल अभिनंदन केले.