Allu Arjun Pushpa-2 : गेल्या अनेक दिवसांपासून सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2′ सिनेमाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. आज अखेर अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त ‘पुष्पा 2′ सिनेमाचा टीझर लॉन्च करण्यात आला. या टीझरमध्ये दिसलेला अल्लू अर्जुनचा लूक यापूर्वीच रिव्हील करण्यात आला होता. हे टीझर म्हणजे, एक प्रकारे त्याच्या फर्स्ट लूकचेच एक्सटेंडेड व्हर्जन आहे. ‘पुष्पा 2’ चा फर्स्ट लूक एप्रिल 2023 मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये अल्लू लाल-निळ्या रंगाच्या साडीत दिसला होता. याशिवाय त्याच्या कपाळावर बिंदी, अंगाला निळा रंग, एका हातात पिस्तूल, नखांवर नेलपॉलिश अन् गळ्यात लिंबाचा हार…
आता टीझरमध्ये त्याच्या पायाच्या घुंगरुही दिसत आहेत. तसेच तिच्या लूकला मोशन देण्यात आले असून, तो एका उत्सवात काही लोकांना मारताना दिसतोय. लोकांना वाटत होते की, दुसऱ्या भागातही पुष्पराज त्याच्या ट्रेडमार्क लुकमध्ये दाखवला जाईल. पण निर्मात्यांनी एक आगळा-वेगळा पुष्पा समोर आणला. फर्स्ट लूक आला, तेव्हाही अल्लू अर्जुन अशा पोशाखात होता. या लूकची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. आता या लूकची खरी कहाणी समोर आली आहे. अल्लू अर्जुनचा साडी लूक तिरुपतीच्या गंगाम्मा जत्रा उत्सवापासून प्रेरित आहे.
गंगम्मा जत्रा म्हणजे काय?
कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात गंगम्मा जत्रा उत्सव साजरा केला जातो. सात दिवस चालणाऱ्या या जत्रेत काही ठिकाणी देवीला मांसाहाराचा प्रसाद अर्पण केला जातो. 7 पैकी 2 दिवस भव्य मिरवणुकदेखील निघते. या मिरवणुकीत पुरुष महिलांप्रमाणे साडी घालून, मेकअप करुन जत्रेत सहभागी होतात. त्यामुळे ‘पुष्पा 2’मधील अल्लूचा लूक या उत्सवापासून प्रेरित असण्याची दाट शक्यता आहे. कदाचित चित्रपटात या गंगम्मा जत्रेची पूजा दाखवली जाईल.
गंगम्मा जत्रेची सुरुवात कशी झाली?
हा उत्सव का होतो? या पूजेमागचे कारण काय? याची दोन कारणे आहेत. ‘गंगम्मा जत्रा’ चित्तूर आणि तिरुपती भागात होते. पण दोन्ही ठिकाणी तो साजरा करण्याची कारणे वेगवेगळी आहेत. ऑनलाइन उपलब्ध माहितीनुसार, चित्तूर (आंध्र प्रदेश) येथे फार पूर्वी एक महामारी पसरली होती, अनेक लोक मरत होते. कोणालाच या परिस्थितीशी सामना करता येत नव्हता. अशा परिस्थितीत एक उपाय सुचला. हा उपाय म्हणजे, संपूर्ण गाव हळद आणि कडुलिंबाच्या पाण्याने शुद्ध करणे. तेव्हापासून ही परंपरा कायम राहिली. त्यामुळे चित्तूरमध्ये ही जत्रा निघते.
‘पुष्पा 2’ मध्ये तिरुपतीची मान्यता!
तिरुपतीची कथा यापेक्षा खूप वेगळी आहे. असे म्हणतात की एकेकाळी पालेगोंडलू नावाच्या माणसाचे या जागेवर वर्चस्व होते. तो एक अत्याचारी, दुष्ट, स्त्रियांशी अपमानास्पद आणि गैरवर्तन करणारा पुरुष होता. त्याच्या अत्याचाराने लोक खुप नाराज होते. यावेळी अविलाल नावाच्या गावात गंगाम्मा नावाच्या देवीचा जन्म झाला. ती मोठी झाल्यावर पालेगोंडलूने तिच्यावरही वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला. देवीने त्याच्यावर हल्ला केला, पण पालेगोंडलू पळून गेला आणि जंगलात अज्ञात ठिकाणी लपला.
त्याला बाहेर काढण्यासाठी एक यात्रा काढण्यात आली. यामध्ये विचित्र वेशभूषा केलेल्या तिरुपतीच्या लोकांनी गंगाम्मा देवीच्या नावाने ओरडणे सुरू केले. सातव्या दिवशी पालेगोंडलू बाहेर पडला आणि गंगाम्मा देवीने त्याचा वध केला. तेव्हापासून ‘गंगम्मा जत्रे’ची परंपरा उदयास आली. आता पुष्पा 2 मध्येही हीच प्रथा दाखवण्यात आली आहे. आपल्या शत्रूंपैकी एकाला बिळातून बाहेर काढण्यासाठी पुष्पाने हे रुप धारण केल्यचा अंदाज आहे. बाकी चित्रपटाचे रहस्य चित्रपट आल्यावरच समोर येईल. हा चित्रपट येत्या 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.