पुण्यातून सर्वात मोठी बातमी : पोलिसांकडून टोल नाक्यावर 50 लाख रुपयांची रोकड जप्त

लोकसभा निवडणुका तोंडावर असताना पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मावळमधील उर्से टोल नाक्यावर 50 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने एकूण नऊ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. शिरगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय शेख आणि त्यांचे टीम मार्फत वाहनांची तपासणी करत असताना एका महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ गाडीच्या तपासणीमध्ये 50 लाख रुपये रोख रक्कम मिळून आली असून त्याबाबत योग्य खुलासा करता आला नाही.

पुणे पासिंगची ही गाडी नेमकी कोणाकडे जाणार होती, याबाबतची चौकशी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून केली जात आहे. या पैशांची वाहतूक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केली जात होती का? असेल तर कोणत्या पक्षाशी संबंधित ही रोकड होती? की यामागे अन्य कोणतं कारण आहे? याची चौकशी सुरू आहे.

निवडणुका तोंडावर असून इतकी मोठी रक्कम सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील मावळ तालुक्यात येणाऱ्या उर्से टोल नाक्यावर सापडलेली ही रक्कम नेमकी कोणत्या कारणास्तव गाडीमध्ये ठेवली होती. या पैशांना आगामी निवडणुकांसोबत काही संबंध आहे का? अनेक प्रश्न उपस्थित झाले असून पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करत आहे.