सायबर फसवणुकीतील ५० हजारांची संपूर्ण रक्कम आठ दिवसांत परत; येरवडा पोलिसांच्या सायबर पथकाची उल्लेखनीय कामगिरी; प्रभावी पाठपुराव्याने नागरिकाला दिलासा

By: Editor_Pratik

On: Friday, August 21, 2026 12:46 PM

Google News
Follow Us

पुणे : मोबाईलवर आलेल्या अद्ययावत संदेशाच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून एका नागरिकाची तब्बल ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणात येरवडा पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने तत्परतेने कार्यवाही करत बँक व संबंधित व्यापाऱ्यांशी प्रभावी पत्रव्यवहार आणि दूरध्वनीद्वारे संपर्क साधत सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश मिळाले असून, फसवणूक झालेली संपूर्ण ५० हजार रुपयांची रक्कम अवघ्या आठ दिवसांत नागरिकाला परत मिळवून देण्यात आली आहे.

येरवडा, पुणे येथील रहिवासी ताजुद्दीन बारभुईया यांना मोबाईल अद्ययावत करण्यासंदर्भातील संदेश प्राप्त झाला होता. त्यानंतर त्यांच्या मोबाईलशी संबंधित फसवणूक होऊन त्यांच्या खात्यातून ५० हजार रुपये परस्पर काढण्यात आले. याबाबत त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यातील सायबर पथकाकडे तक्रार अर्ज दाखल केला. या प्रकरणाची नोंद सायबर अर्ज क्रमांक 31908260172461/2026 अशी करण्यात आली.

तक्रार प्राप्त होताच येरवडा पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. फसवणुकीची रक्कम ज्या माध्यमातून हस्तांतरित झाली, त्या संबंधित बँक व व्यापाऱ्यांशी तातडीने संपर्क साधण्यात आला. तसेच आवश्यक कागदपत्रे, पुरावे आणि पाठपुरावा करून फसवणुकीची रक्कम परत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

पोलिसांच्या या तत्पर आणि सातत्यपूर्ण कार्यवाहीमुळे ५० हजार रुपयांची संपूर्ण रक्कम आठ दिवसांच्या कालावधीत परत मिळविण्यात यश आले. त्यामुळे सायबर फसवणुकीला बळी पडलेल्या नागरिकाला मोठा दिलासा मिळाला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-४ चिलुमुला रजनिकांत आणि सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, पोलीस हवालदार समीर पिलाने, पोलीस शिपाई रविंद्र गाडेकर, मनोज भागवत, स्वप्निल पिंगळे आणि मिनाक्षी कापडे यांनी सायबर तपास पथकाच्या माध्यमातून ही कारवाई केली.

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

दरम्यान, मोबाईल अद्ययावत करणे, बँक खाते बंद होणे, केवायसी पूर्ण करणे अथवा अन्य कोणत्याही कारणाने आलेल्या संशयास्पद संदेशांमधील संकेतस्थळे किंवा दुवे उघडू नयेत. अनोळखी व्यक्तींना बँक खात्याची माहिती, संकेतांक किंवा इतर गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता तातडीने पोलिसांशी संपर्क साधल्यास फसवणुकीची रक्कम परत मिळविण्याची शक्यता वाढते, हे या प्रकरणातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now