फोन महागतोय अन् नुकसान वाढतंय; ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा पडला; संरक्षण योजना केवळ ६ ते ८ टक्क्यांकडेच

By: Editor_Pratik

On: Friday, August 21, 2026 5:57 AM

Google News
Follow Us

पुणे : भारतातील सर्वाधिक रेटिंग मिळालेल्या इन्शुरटेक प्लॅटफॉर्म ‘वनअसिस्ट’ने ‘हंसा रिसर्च’ या जागतिक स्तरावरील रिसर्च एजन्सीच्या सहकार्याने तयार केलेला अहवाल सादर केला. ‘द ग्रेट इंडियन स्मार्टफोन प्रोटेक्शन क्रायसिस’ या अहवालात भारतातील स्मार्टफोनचा वापर, अपघाती नुकसान आणि संरक्षण योजनांचा स्वीकार यांचा अभ्यास करण्यात आला आहे. ग्राहकांचे स्मार्टफोनवरील अवलंबित्व सातत्याने वाढत असताना, वारंवार होणारे अपघाती नुकसान, वाढत्या स्मार्टफोनच्या किमती आणि दीर्घ वापराचा कालावधी असूनही संरक्षण योजनांचा स्वीकार तुलनेने अत्यंत कमी असल्याचे आढळून आले आहे.

स्मार्टफोन दुरुस्तीचा खर्च मोठा

भारतीयांच्या कामकाजापासून बँकिंग, खरेदी, संवाद आणि मनोरंजनापर्यंत स्मार्टफोन आता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे तो ग्राहकांच्या सर्वाधिक मौल्यवान दैनंदिन साधनांपैकी एक ठरला आहे. स्मार्टफोनच्या किमती वाढत असताना आणि ग्राहक आपले फोन अधिक काळ वापरत असल्याने, अपघाती नुकसान आणि दुरुस्तीचा आर्थिक फटका अधिक गंभीर होत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. २६ ते ३० या वयोगटातील ग्राहक सर्वाधिक ‘कनेक्टेड’ म्हणून समोर आले असून, संवाद, डिजिटल पेमेंट्स, खरेदी आणि मनोरंजनासाठी त्यांचे स्मार्टफोनवरील अवलंबित्व सर्वाधिक आहे.

फोन पडणे, स्क्रीन खराब होणे

स्मार्टफोनचे अपघाती नुकसान ही अत्यंत सामान्य बाब आहे. अभ्यासानुसार, ८२ टक्के ग्राहकांचा स्मार्टफोन किमान एकदा तरी चुकून खाली पडतो. ७२ टक्के ग्राहकांच्या फोनचे अपघाती नुकसान झाले आहे. फोन खाली पडणे आणि स्क्रीन खराब होणे, ही नुकसानीची प्रमुख कारणे असल्याचे दिसून आले. स्मार्टफोनचा दीर्घकाळ आणि वारंवार वापर करताना असलेल्या दैनंदिन जोखमी यातून स्पष्ट होतात. फोन खराब होण्याचा भावनिक परिणामही तितकाच लक्षणीय आहे. फोन खाली पडल्यानंतर ३५ टक्के यूजर घाबरले, २४ टक्के जणांचे या घटनेवरून कोणाशी तरी भांडण झाले, १५ टक्के पुरुषांमध्ये हे प्रमाण ३३ टक्के आहे.

खिशातून किंवा बॅगमधून फोन निसटणे हे सर्व अपघाती नुकसानीच्या घटनांपैकी ३६ टक्के घटनांसाठी कारणीभूत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा धोका असूनही, केवळ ३६ टक्के ग्राहकांनी स्मार्टफोन वापराच्या कालावधीत कधीतरी संरक्षण योजना वापरल्याचे सांगितले. स्मार्टफोनसाठी विमा संरक्षण घेतलेल्या सक्रिय ग्राहकांचे प्रमाण अवघे सहा ते आठ टक्के आहे. पूर्वी कधीतरी संरक्षण योजना वापरणारे आणि सध्या संरक्षण असलेले ग्राहक यांच्यातील ही मोठी तफावत अशा बाजारपेठेकडे निर्देश करते, जिथे ग्राहक एकदा संरक्षण योजना वापरून पाहतात. मात्र, तिचे नूतनीकरण करत नाहीत किंवा दावा करण्याची वेळ येण्यापूर्वीच ती सोडून देतात.

स्मार्टफोन संरक्षण योजनांविषयी ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता असली तरी, अजूनही परवडणारी किंमत, योजनेच्या फायद्यांविषयी मर्यादित माहिती आणि दाव्यांच्या प्रक्रियेवरील विश्वासाचा अभाव हे स्वीकारातील प्रमुख अडथळे असल्याचे अनेकांनी सांगितले. फोन खराब झाल्यानंतर भारतीय ग्राहक स्वतःच त्यासाठी विविध मार्ग अवलंबतात. २९ टक्के ग्राहकांनी पाण्यामुळे खराब झालेला फोन तांदळात ठेवला, तर २० ते ३२ टक्के ग्राहकांनी खराब झालेला फोन तात्पुरता सांभाळण्यासाठी टेप किंवा इतर तात्पुरत्या उपायांचा वापर केला. यातून औपचारिक दुरुस्ती करून घेण्याबाबतची अनिच्छा आणि खराब फोनसह जगण्याची सवय सामान्य होत असल्याचे दिसते. संरक्षण योजना अधिक सोप्या करणे, पारदर्शकता वाढवणे आणि स्मार्टफोनच्या संपूर्ण वापरकाळात ग्राहकांचा विश्वास मजबूत करणे, ही उद्योगासाठी मोठी संधी असल्याचे अहवालाचे निष्कर्ष सूचित करतात.

महिला स्मार्टफोनवर सर्वाधिक अवलंबून

महिला स्मार्टफोनवर सर्वाधिक अवलंबून असल्याचेही दिसून आले आहे. ७९ टक्के महिला सोशल मीडियासाठी स्मार्टफोन वापरतात. पुरुषांमध्ये हे प्रमाण ६९ टक्के आहे. ९४ टक्के महिलांचा फोन चुकून खाली पडला असून, पुरुषांमध्ये हे प्रमाण ८० टक्के आहे. याशिवाय ७९ टक्के महिलांच्या स्मार्टफोनचे अपघाती नुकसान झाले आहे. पुरुषांमध्ये हेच प्रमाण ७१ टक्के आहे.

फोन पडल्यावर महिलांत घबराट

– फोन खाली पडल्यानंतर ४३ टक्के महिला घाबरल्या; पुरुषांमध्ये हे प्रमाण ३३ टक्के होते.
– महिलांच्या स्मार्टफोनचे नुकसान घरगुती परिस्थितींशी अधिक संबंधित असल्याचेही दिसून आले.
– लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांमुळे होणाऱ्या घटनांचे प्रमाण महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत तिप्पट आहे.

‘रिफर्बिश्ड’ स्मार्टफोनकडे वाढता ओढा

नवीन स्मार्टफोनच्या खरेदीपलीकडे, भारतातील विकसित होत असलेल्या ‘रिफर्बिश्ड’ आणि ‘प्री-ओन्ड’ स्मार्टफोन बाजारपेठेचे वाढते महत्त्वही या संशोधनातून अधोरेखित झाले आहे. ग्राहक जुने फोन अधिक काळ वापरत असून, त्यांची अदलाबदल करणे किंवा ‘प्री-ओन्ड’ खरेदी करण्यावर त्यांचा वाढता भर आहे. अशा परिस्थितीत वॉरंटी आणि संरक्षण योजना स्मार्टफोनसंदर्भात ग्राहकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अधिक महत्त्वाच्या ठरत आहेत. ७० टक्के ग्राहकांच्या मते नवीन फोनच्या तुलनेत ‘प्री-ओन्ड’ उपकरणांसाठी संरक्षण योजना अधिक महत्त्वाच्या आहेत. ३० टक्के ग्राहकांनी वॉरंटी किंवा संरक्षण योजना उपलब्ध असल्यास ‘प्री-ओन्ड’ फोन खरेदी करण्याचा विचार करू शकतो, असे सांगितले. ‘रिफर्बिश्’ड स्मार्टफोन बाजारपेठेच्या वाढीसाठी हा एक महत्त्वाचा घटक ठरू शकतो. विशेष म्हणजे, ‘नॉन-मेट्रो’ शहरांतील ५४ टक्के ग्राहकांनी ‘प्री-ओन्ड’ स्मार्टफोन खरेदी केले असून, महानगरांध्ये हेच प्रमाण ३० टक्के आहे.

‘ग्राहकांच्या वर्तनात रंजक विरोधाभास’

‘वनअसिस्ट’चे सह-संस्थापक सुब्रत पाणी म्हणाले, की ‘या संशोधनातून ग्राहकांच्या वर्तनातील रंजक विरोधाभास दिसून येतो. लोक कशाप्रकारे संवाद साधतात, व्यवहार करतात, काम करतात आणि मनोरंजनाचा आनंद घेतात, यासाठी स्मार्टफोन अपरिहार्य झाला आहे आणि अपघाती नुकसान हा स्पष्टपणे एक सामान्य अनुभव आहे. तरीही, मोठ्या संख्येने ग्राहक कोणत्याही प्रकारच्या संरक्षणाशिवाय स्मार्टफोन वापरत आहेत आणि त्याच वेळी नुकसान किंवा बिघाडाबद्दल सतत चिंतेत आहेत. उपकरण अधिक मौल्यवान होत असताना आणि त्यांचा वापराचा कालावधी वाढत असताना, ग्राहकांना त्यांच्या संपूर्ण स्मार्टफोन वापराच्या प्रवासात अधिक विश्वास आणि मनःशांती हवी आहे. त्यामुळे परवडणारी किंमत, साधेपणा आणि विश्वास यासंबंधी ग्राहकांच्या चिंता अधिक प्रभावीपणे दूर करणे उद्योगासाठी महत्त्वाचे आहे.’

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 21, 2026

August 21, 2026

August 21, 2026

August 20, 2026

August 20, 2026

August 20, 2026